यवत । विषारी औषध घालून बनविलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे मुळा-मुठा नदीच्या काठावर चरणार्या जनावरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुभाष श्रीपती पासलकर याच्यावर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत जनावरांमध्ये एक म्हैस, एक गाय, एक वासरू, एक बोकड, सहा शेळया, दोन मेंढ्यांचा समावेश आहे.
पासलकर याचे मुळा-मुठा नदीच्या काठी शेत जमीन आहे. आपल्या शेताच्या कडेला दुसरी जनावरे येऊ नये म्हणून विषारी औषध घालून तयार केलेले पिठाचे गोळे पासलकर याने शेताच्या तसेच नदीच्या कडेला टाकले होते. यावेळी राजेंद्र दिवेकर यांची आठ व अन्य एकाजणाची 4 अशी 12 जनावरे नदीच्या किनारी चरत होती. त्यांनी पासलकर याने टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने विषबाधा होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार जिजाबा वाजे करीत आहेत.