बाराबंकी: उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये काल विषारी दारूचे सेवन केल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी पप्पू जैयस्वालला अटक करण्यात आले असून १२ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
सोमवारी रात्री राणीगंज आणि शेजारच्या खेड्यांतील लोकांनी रामनगर भागातील दुकानातून ही दारू विकत घेतली. मंगळवारी पहाटे या लोकांना अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना रामनगर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. त्यांच्यापैकी किमान 16 जणांना लखनौतील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर डायलेसीसचा उपचार सुरू असून, पाच ते सहा जणांना लखनौतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये व बलरामपूरला आणण्यात आले. रुग्णालयांत जे लोक आहेत त्यांना शक्य ती सर्व वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश दिले गेले आहेत. मात्र उपचारादरम्यान विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण आजारी पडल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विषारी दारू प्यायल्याने अनेकांची अचानक तब्येत बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 127 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसेच दारूचे नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. विषारी दारू ही शहराच्या बाहेरून आणली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचार्यांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले होते.