नंदुरबार। चार्यात विष प्रयोग करून गौशाळेतील 18 जनावरांचा मृत्यू झाला. खापर ब्राह्मण गाव रस्त्यावरील श्री महावीर गौशाळेत ही घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. खापर रस्त्यावर ही गौशाळा असून त्यात एकूण 150 जनावरे आहेत. या जनावरांना बुधवारी रात्री कामगारांनी चारा टाकला होता.
गुरुवारी सकाळी पाहिले तर त्यातील 18 जनावरांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच गौशाळेचे अध्यक्ष लुनकरण जैन हे घटनास्थळी पोहचले. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी नोंदविली आहे. अज्ञात व्यक्तींनी चार्यात विष कालवून हा प्रयोग केल्याचे त्यात म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात लोकांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.