कल्याण । कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास सज्ज राहणार्या पोलीस कर्मचारी अधिकार्यांवर हल्ले वाढू लागल्याने हा चिंतेचा विषय बनू लागला आहे. गणेश विसर्जनदिवशी कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करणार्या पोलीस कर्मचार्याला त्रिकूटाने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पोलिसाचा गणवेश फाडून चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी दत्ता जाधव, रवींद्र जाधव व सुदेश गुप्ता या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होती. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष भोईर हे आपल्या सहकारी कर्मचार्यांसह बिर्ला कॉलेज रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना दत्ता जाधव, रवींद्र जाधव व सुदेश गुप्ता हे तिघे जण या परिसरात मारामारी करत असताना आढळून आले. त्यावेळी मधस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच तिघांनी हल्ला केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिस शिपाई भोईर यांनी तात्काळ या तिघांना ताब्यात घेतले. त्यामुळे संतापलेल्या दत्ता जाधव, रवींद्र जाधव व सुदेश गुप्ता या तिघांनी भोईर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणातच या तिघांनी भोईर यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करत त्यांचा गणवेश फाडला. इतकेच नव्हे तर त्यांना चावा घेत त्यांच्या सहकार्यांना ही मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दत्ता जाधव, रवींद्र जाधव व सुदेश गुप्ता या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पोलिसांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस नियमावली करण्याची गरज आहे. जेेणेकरुन पोलीस मनोबळ वाढेल. गणेश विर्सजनाच्यादिवशीच पोलिस शिपाई संतोष भोईर यांना दत्ता जाधव, रवींद्र जाधव व सुदेश गुप्ता या तिघांनी वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही क्षणातच या तिघांनी भोईर यांचा गणवेश फाडला. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.