पुणे । भारतीय शास्त्रीय संगीतातील विलंबित ख्यालासारखे संगीत जगात दुसरे कुठलेही नाही. ते टिकवून ठेवणे हा आपला धर्म आहे. राग जेव्हा विस्ताराने गायला जातो आणि गायकाबरोबर श्रोतेही स्वतः तो राग होतात. हा अनुभव अत्यंत सुंदर असतो. त्यामुळे एका तासाचा राग ऐकण्याचा प्रेक्षकांनी सराव करायला हवा, असे मत जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी व्यक्त केले.केवळ राग गाणारे तेजस्वी गायक तयार व्हावेत यासाठी त्यांच्यासमोरील आर्थिक अडचणीही हलक्या होणे गरजेचे असते. ही समाजाची जबाबदारी असून मोठ्या व्यावसायिक समुहांनी त्यांना पाठबळ द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमात शुक्रवारी ‘स्वरसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी आरती अंकलीकर-टिकेकर, प्रसिद्ध गायक महेश काळे आणि श्रीनिवास जोशी यांनी ‘सर्जनाची आव्हाने’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. आरतीताई म्हणाल्या, लोकांना आवडतो म्हणून कलाकाराने दहा मिनिटांचा राग का गावा? रागसंगीत गाणारा गायक हा केवळ राग गात नसतो, तर तो संगीताची परंपरा पुढे नेत असतो. विस्तृतपणे गायल्या जाणार्या रागाच्या सुरांमध्ये तरंगणे हा सुंदर अनुभव आपण का बरे गमवावा? त्यामुळे श्रोत्यांनीही एक तासाचा राग ऐकण्याचा सराव करावा. मैफलीच्या ठिकाणी पंधरा मिनिटे आधी पोहोचून शांतपणे बसावे आणि मग समोरच्या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे सांगावेसे वाटते.
हिमनगाचे केवळ टोक…
या वेळी आरती अंकलीकर व महेश काळे यांनी स्वरचित बंदिशीही ऐकवल्या. काळे म्हणाले, अभिषेकीबुवांकडे मिळालेल्या शिक्षणात पेशकश नव्हे, तर साधना हे अंग अधिक होते. रियाजाच्या वेळातच गायक खर्या अर्थाने सर्जनशीलता जपत असतो. मैफलीतील सादरीकरण हे हिमनगाचे केवळ टोक असते. स्वैर अंग हे शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत माणसात उत्स्फूर्तपणा टिकून राहील, तोपर्यंत शास्त्रीय संगीत टिकून राहील आणि समयोचित वाटत राहील. ‘षड्ज’ या कार्यक्रमात रजत कपूर दिग्दर्शित ‘तराना व पी. के. साहा दिग्दर्शित ‘सारंगी – द लॉस्ट कॉर्ड’ हे लघुपट दाखविण्यात आले. रागाच्या तानांमधून गायकाचे कौशल्य दिसते, परंतु रागाचे खरे सौंदर्य आलापीत असते. ’आलापी’, ’मींड’ या खोलवर जाऊन अनुभव घ्यायच्या गोष्टी श्रोत्यांच्या समोर येणे व टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. विस्ताराने गायला जाणारा राग जगाच्या अंतापर्यंत टिकून राहायला हवा, असे त्या म्हणाल्या.
गायत्री वैरागकर-जोशी यांच्या सुश्राव्य गायन
65व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसर्या दिवसाची सुरुवात युवा गायिका गायत्री वैरागकर-जोशी यांच्या सुश्राव्य गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंतीतील ‘प्यारे पिया बिन मोहे’ ही रचना सादर केली. ‘काहे मान करो सखीरी अब’ या लोकप्रिय रचनेसह त्यांनी ‘म्हारे घर आओ जी’ हे मीरेचे भजनही सादर केले. सागर कुलकर्णी (हार्मोनियम), अजिंक्य जोशी (तबला), श्वेता कुलकर्णी व मानसा ग्रामपुरोहित (तानपुरा) आणि संतोषगोराडे (टाळ) यांनी त्यांना साथसंगत केली. त्यांच्यानंतर प्रसिद्ध सतार वादक कुशल दास यांचे वादन झाले. त्यांनी सतारीवर राग मारवा सादर केला. पं. रामदास पळसुले यांनी त्यांना तबल्याची संगत केली.
ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांचा सन्मान
ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना या वर्षीचा ‘कै. सौ. वत्सलाताई जोशी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, पं. उपेंद्र भट, शुभदा मुळगुंद, प्रभाकर देशपांडे आणि शिल्पा जोशी यांच्या उपस्थितीत पं. मुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. एक्कावन्न हजार रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पं. मुळे यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायकांना तबल्याची संगत केली आहे.