विस्तारासाठी विस्तवाशी खेळ नको!

0

पुढील तीन-साडेतीन वर्षे सत्तेत मुख्यमंत्रीपद भुषवण्याची स्वप्ने पाहत मोठ्या राजकीय घडामोडी घडवू लागलेल्या शशिकलांना पुढील साडेतीन वर्षांसाठी वेगळेच स्थान मिळाले आहे! चेन्नईच्या फोर्ट जॉर्जमधील सचिवालयातील मुख्यमंत्री दालनाऐवजी त्यांना आता कारागृहात जावे लागले. तेही नेमके मुख्यमंत्रीपदाच्या त्यांना लाभणार असलेल्या कार्यकाळाएवढेच! काळाचा सूड म्हणतात तो हाच!

भारतात दक्षिणेकडे खूपच भडकपणा असतो. दक्षिणेतील लोकजीवन आहेही तसेच. दाक्षिणात्यांचा स्वभाव हा तसा भडकच. त्यांच्या वागण्याबोलण्यात, आवडी-निवडीत तो भडकपणा दिसत असतो. अगदी आपल्याला खुपावा इतका. त्यामुळे तेथे अभिनेते नसतातच असतात ते सुपरस्टारच! तेथे नेतेही नसतातच तर असतात महानेतेच! तमिळ जनता प्रेम करते तेव्हा भरभरून आणि राग काढते तोही टोकाला जाऊनच! त्यामुळेच 2011मध्ये सत्तेवर आलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला 2016मध्ये तमिळींनी पुन्हा सत्तेवर बसवले तेव्हा राजकीय निरीक्षकांना आश्चर्य वाटले. कारण दर पाचवर्षांनी सत्ताबदल तोही अगदी आधीच्या सत्ताधाऱ्यांना धुवून काढणारा हेही तमिळ राजकारणाचे वैशिष्ट्यच! कारण त्याआधी 5 वर्षांपूर्वी सत्तेवर असलेल्या अण्णादुमुकपक्षाला लाजिरवाण्या पराभवाच्या गर्तेत लोटताना तमिळींनी जयललितांना साधे आमदारही राहू दिले नव्हते. इतके टोकाचे असते सारे!

जयलितांच्या सहआरोपी असणाऱ्या शशिकलांनी पुढे पुन्हा अम्मांची मर्जी प्राप्त केली. त्या सत्तेच्या वर्तुळात परतल्या. मात्र खटला सुरुच राहिला. अम्माच्या जाण्यानंतर सामान्य तमिळी आणि अण्णाद्रमुकच्या अम्माभक्तांमध्ये अम्मांसाठी जसा शोक होता तसाच राग होता तो शशिकलांसाठी. मात्र अम्मांनी गादीवर बसवलेला त्यांचा भरत पनिरसेल्वम अनेकांना खुपत असत. शशिकला अशांपैकीच. यामुळेच त्यांनी पक्षाचे सरचिटणीसपद हाती घेतल्यानंतर अल्पावधीतच सरकारही ताब्यात घेण्याचा डाव खेळला. त्यानुसार ‘भरत’ भूमिकेत कायम असणारे पनिरसेल्वम यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र भरताचा विभिषण झाला. बहुधा सातत्याने तीन वेळा नाइट वॉचमन राहून त्यांना कंटाळा आला असावा. तसेच राम असला तर भरत निष्ठा राखेल. आपल्याऐवजी रामाच्या पादुकांना सिंहासनावर ठेऊन पुजत सत्ता राबवली. तीही तीन वेळा! पण जेव्हा रामच नाही तर भरत कसा भरत कसा राहील? त्यांनी पुकारले बंड. त्यात शशिकलांना शिक्षा होणे त्यांना पर्वणी वाटली असावी.

पण शशिकला चैनम्माच्या आपल्या नव्या अवतारात प्रतिस्पर्ध्यांना चिरडण्याचे अम्मांचे गुण घेऊनच होत्या. त्यांनी जाता-जाता आपल्यासाठी एक भरत शोधला. इड्डापड्डी पलानस्वामी यांची निवड त्यांनी अण्णा द्रमुकच्या विधीमंडळ नेतेपदी घडवून आणली. पलानस्वामींनी तात्काळ पनिरसेल्वनसह त्यांच्या 18 समर्थकांना पक्षातूनच काढून टाकले. अर्थात त्याने सारे संपले असे नाही. पनिर हे दूध नासल्यानंतर तयार होते. शशिकलांच्या सत्तेचे दूध नासले आहे. सध्या तरी! त्यामुळे पनिरसेल्वनना चांगले दिवस येतील का ते लवकरच सिद्ध होईल. पण भीती त्यापुढची आहे. अम्मांचे नाव घेत राजकारण करणाऱ्या या सर्व राजकारण्यांमध्ये असलेल्या भांडणांचा गैरफायदा घेत एखाद्या बोक्याने सत्तेचे पनिर मटकावू नये म्हणजे झाले.

पनिरसेल्वन यांची आमदारांमध्ये तशी निरुपद्रवी का होईना एक प्रतिमा आहे. संकटात असताना अम्मा ज्यांना विश्वासाने कारभार सोपवत तो नेता म्हणजे पनिरसेल्वन ही सामान्यांच्या मनातीलही एक वेगळी प्रतिमा आहे. मात्र गेले काही दिवस ते ज्या राजकीय चाली चालत आहेत त्या त्यांच्या स्वत:च्या असण्याविषयी शंका आहे. कारण जर एवढी हिंमत असती तर त्यांनी राजीनामा दिलाच नसता. ते उभे ठाकले असते. मात्र त्यांच्या पाठीतील कण्याची आठवण त्यांना नंतर झाली. याचा अर्थ स्पष्ट आहे कुणीतरी त्यांना रणनीति देत आहे.

पनिरसेव्हन यांनी जरी आव्हान दिले, तरी त्यावेळी सामान्यांचा राग असलेल्या शशिकला त्यांच्या समोर होत्या. आता समोर असलेले पलानस्वामी यांची तशी प्रतिमा नाही. म्हणजे एकीकडे शक्तिशाली शशिकला नाहीत पण त्याच बरोबर पनिरसेल्वनसारखीच अण्णाद्रमुकचा अम्मा निष्ठावान अशी प्रतिमा असलेले पलानस्वामी! अर्थात एकच फायद्याची बाब म्हणजे पनिरसेल्वम आमदारांना आपल्यापैकी वाटतात. त्यामुळे शशिकला संकटात येण्यापूर्वीच त्यांच्याकडे आमदार-खासदारांचा ओघ सुरु झाला. पण आता पलानस्वामींनी हकालपट्टी केल्यानंतर हा ओघ राहील का याबद्दल शंका आहे.
अण्णाद्रमुकचे जे होईल ते होईल. त्यात आपण येथे महाराष्ट्रात चिंता करायचे कारण नव्हते. पण पनिरसेल्वनच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जर कुणी दक्षिणेत घुसखोरीचा प्रयत्न करत असेल तर ते उलटूही शकते. तमिळ अस्मिता हा वेगळा प्रकार आहे. अगदी भडक जहाल असा. 1970नंतर तेथे प्रादेशिक पक्षांशिवाय अन्य कुणीच सत्तेत येऊ शकलेले नाही. आता जर राष्ट्रीय पक्षाच्या चालीने सत्ता गमवावे लागलेल्या गटाने अस्मितेचा मुद्दा चेतवला तर तेथे वेगळीच आग भडकेल. आणि ती आग शमवण्यासाठी जयललिता अम्मांसारखे प्रभावी नेतृत्वही नाही. त्याचा फटका देशाला बसेल. त्यामुळे विस्तारवादी धोरण राबवताना राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक अस्मितांना नजरेआड करु नये एवढेच!