विस्तारासाठी हवी जुनी तहसील

0

भुसावळ ।  शहरातील यावल रोडवरील ब्रिटीशकालीन इमारतीत सुरू असलेल्या तहसील कार्यालयाचे जळगाव रोडवरील नवीन प्रशस्त इमारतीत स्थलांतर झाल्याने रिक्त जागा शहर पोलीस ठाण्याच्या विस्तारासाठी देण्यात यावी यासाठी पोलीस प्रशासनाने आग्रही मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे तर याच इमारतीत असलेल्या दुय्यम कारागृहाच्या (जेल) विस्तारासाठी देखील इमारतीची काही जागा द्यावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कारागृह प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर हे याबाबत सकारात्मक भूमिका घेतील, असा शहरवासीयांना आशावाद आहे.

ब्रिटीशकालीन इमारत 1931 मध्ये ब्रिटीशकाळात यावल रोडवरील जुन्या तहसील कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. त्याकाळी तहसीलदार हेच जेलर असत व याचइमारतीपासून काही अंतरावरील जागेवर (आताचे सटार्वजनिक वाचनालय) येथे गुन्हेगारांना फाशी दिली जात असल्याचा उल्लेख जुन्या कागदपत्रांवर आढळतो. तब्बल 86 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीचे बांधकाम कौलारू व चुन्यात करण्यात आले आहे मात्र भक्कम तटबंदीमुळे या इमारतीचा काही भाग दुय्यम कारागृहाला गेल्या अनेक वर्षांपासून देण्यात आला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी या कारागृहाची किरकोळ डागडूजी करण्यात आल्याचे जेलर जितेंद्र माळी यांनी सांगितले

….तर कामकाजात येणार सुटसुटीतपणा

शहर पोलीस ठाण्याची इमारत दुमजली असलीतरी कर्मचार्‍यांना बसण्यासाठी धड जागा नाही शिवाय गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्याची सोय नाही तसेच अपघात वा गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने बाहेरच लावली जात असल्याने त्यांची दुर्दशा सुरू आहे. जुन्या तहसीलची इमारत मिळाल्यास पोलिसांच्या कामकाजात सुटसुटीतपणा येणार असून कामकाज करणे अत्यंत सोयीचे होणार आहे.

जेलचा होणार विस्तार 

जुन्या तहसीलच्या इमारतीत दुय्यम कारागृहदेखील आहे. 60 कच्चे कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या या कारागृहात नेहमीच 55 वर कच्च्या कैद्यांचा मुक्काम असतो. शिवाय शहरातील अतिरिक्त सत्र न्यायालयामुळे भुसावळ विभागातील कैद्यांनाही याच कारागृहात ठेवावे लागते. वेळ-प्रसंगी ही संख्या वाढल्यास या कैद्यांना जळगाव कारागृहात हलवण्याची वेळ येते. दुय्यम कारागृहाला या इमारतीच्या काही खोल्या मिळाल्यास कैदी ठेवण्याची क्षमता वाढणार आहे.

शहर पोलीस ठाण्याचा विस्तार वाढवण्यासाठी जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीची मागणी जिल्हाधिकारी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या इमारतीच्या काही खोल्या मिळाल्यास कामकाजात सुटसुटीतपणा येऊन कर्मचार्‍यांची सोय होईल.

नीलोत्पल, सहाय्यक पोलीस अधीक्षक

जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या काही खोल्या दुय्यम कारागृहासाठी मिळाल्यास कच्चे कैदी ठेवण्याची आणखी सोय होईल तसेच कर्मचार्‍यांच्या राहण्याचा प्रश्‍नही सुटणार आहे. 2015 पासून या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

जितेंद्र माळी, जेलर, दुय्यम कारागृह