खासदार रक्षा खडसे यांची शिष्टाई सफल ; उपोषण अखेर मागे
भुसावळ– प्रांताधिकारी यांच्या अखत्यारीत येणार्या सर्व्हे क्रमांक 59 ते 61 व 77 मध्ये निर्माण झालेला पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी या भागातील रहिवाशांनी बुधवारपासून आमरण उपोषण छेडले होते तर दुसर्या दिवशीही मागणी पूर्ण होण्यासाठी उपोषणार्थींनी उपोषण सुरूच ठेवले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास खासदार रक्षा खडसे यांनी उपोषणार्थींशी यशस्वी चर्चा केली. सुमारे 20 लाख रुपये खर्चून तात्पुरती पाणीपुरवठा योजना (टीपीडब्ल्यूएस) या भागात केली जाणार असून दोन दिवसात त्याबाबत प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचे आश्वासन खडसे यांनी दिल्यानंतर उपोषणार्थींनी उपोषण मागे घेतले. नगराध्यक्ष रमण भोळे, प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता पी.एस.लोखंडे, गटविकास अधिकारी एस.बी.मावळे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, रजनी संजय सावकारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हेाते.