तिच्या आत्म्याला उद्देशून किंवा तिच्या मृत्युपश्चात जन्माला दृष्टीपुढे ठेवून जर का कुणी तिची वारेमाप स्तुती करीत असेल, तर ते वाचून गौरी लंकेश खळखळून हसेल. आम्ही किशोरवयात असतानाच निश्चितीपर्यंत पोहोचलेलो की स्वर्ग, नरक आणि मृत्यूनंतर जीवन या निव्वळ निरर्थक कल्पना आहेत. या पृथ्वीवरच पुरेशा प्रमाणात स्वर्ग आणि नरक आहेत. लोक करतात तशा देवाला आळवण्या करण्यापेक्षा त्याला करायचे ते करू द्या. त्याला एकटा सोडा.तरुणाईत आमची मतं अशी असली, तरी आमचा एक करार होता. आपल्या कुटुंबातील लोक असोत की इतर त्यांच्या तथाकथित देवभोळ्या समजुतींची आणि भ्रामक कर्मकांडांची खिल्ली उडवायची नाही की त्यांचा अनादर करायचा नाही. अशा उत्तम वागण्याचा आम्हाला नंतर फायदा झाला. 27 वर्षांपूर्वी आम्ही घटस्फोट घेतला. त्याआधी पाच वर्षे आम्ही वैवाहिक जीवनात घालवली आणि पाच वर्षे एकमेकांवर छाप टाकण्यात. आम्ही घनिष्ठ मित्र होतो. आमचा करार एकच होता. कुणाचंही मन दुखवायचं नाही अगदी एकमेकांचंही.
आमची भेट नॅशनल कॉलेजमध्ये झाली. भारतातील बुद्धिवादी चळवळीचे ते जन्मस्थान होते. आमचे प्राचार्य नरसिंमय्या आणि श्रीलंकेचे विचारवंत डॉ. अब्राहम कुवूर चळवळीचे प्रणेते होते. आम्ही त्यावेळी त्यांना खूप प्रश्न विचारायचो. भारतातील खंडीभर आध्यात्मिक बाबा आणि माता, मांत्रिक, अंधश्रद्धा यावर आक्षेप घेताना खूप उत्साह वाटायचा. हे मी आताच तुम्हाला का सांगू लागलोय माहीत आहे का…मला तिच्या हत्येची पार्श्वभूमी सांगून या घटनेला संदर्भाच्या चौकटीत आणायचं आहे. धर्मांधशक्ती बुद्धिवादी आणि अज्ञेयवादी व्यक्तींच्या टप्प्यात नेहमी असतात. धर्म, राजकारण आणि एकंदर जीवनाच्या तणावामध्ये प्रवेश करण्याआधी आम्ही दोघांनी पहिलचं पुस्तक वाचलं होतं विल ड्यूरंटचे स्टोरी ऑफ फिलॉसॉफी, असं त्याचं नाव होतं.
त्यावेळी आमच्यापैकी कुणाचेच आमच्या कन्नड या मातृभाषेवर प्रभुत्व नव्हते. त्यामुळे मोठ्या वैचारिक खजिन्याला आम्हाला मुकावे लागले. प्रीमिअर बुक शॉपचे शानभाग वुडहाऊस ते ग्रॅहॅम ग्रीनची पुस्तके आम्हाला 20 टक्के सवलतीने देत असत. नंतर गौरी कन्नडकडे परतली. टेरी जॅकचे सीझन्स इन द सन नुकतेच प्रकाशित झाले होते. आम्ही एरिक सिगलचे लव्ह स्टोरी वाचून हसलो. अब्बा, सॅटरडे नाईट फिवर आणि गांधी या फिल्मही डेटिंगच्या वेळी पाहिल्या. कार्ल सगान वाचून तारे आणि आकाशगंगा पाहण्यासाठी काळोख्या रात्री हिंडलो. तिचं वर्णन कसं करावं हेच मला सुचत नाही. मी कॉलेज जीवनात असतानाच धूम्रपान करतो हे तिला पटत नव्हतं आणि नंतर तिचं धूम्रपान करू लागली. एकदा ती मला अमेरिकेत भेटली. पूर्वपत्नी मला भेटत होती. तिला मी सांगितलं की कार्पेट खराब होतेय म्हणून घरात सिगारेट ओढू नको. तेव्हा थंडीचे दिवस होते. ती म्हणाली मग मी काय गच्चीवर जाऊ का. तिथे किती थंडावा आहे माहीत आहे का आणि मूर्खा तुझ्यामुळेच मला सिगारेटची सवय लागली. मी म्हणालो, सॉरी पण पोरी मी तुला सिगारेट सोडायलाच सांगतोय. आमचे मित्रमैत्रिणी आमच्या मैत्रीमुळे हैराण होत होते. विघटन आणि घटस्फोट भारतात अत्यंत कडवट असा अनुभव असतो. तसा इतर ठिकाणीही तो असतोच म्हणा. आम्ही एकत्र असायचो ते उच्च पातळीवरील क्षणांचा आनंद घेत.
घटस्फोटाच्या वेळी आम्ही कोर्टात समोरासमोर यायचो. वकील म्हणायचा अरे तुम्हाला स्वतंत्र मार्गावर चालायचे आहे, तर वेगळे व्हा एकदाचे. शेवटी एकदाचा घटस्फोट झालाच. त्यानंतर आम्ही एमजी रोडवरील ताजमध्ये आम्ही जेवायला गेलो. त्या हॉटेलला सदर्न कम्फर्ट अर्थात दाक्षिणात्य विसावा असं म्हटलं जायचं. त्यावरूनही आम्ही हसलो आणि एकमेकांना अलविदा केलं. मी दिल्लीत आणि नंतर मुंबई आणि शेवटी वॉशिंग्टनला पोहोचलो. प्रत्येक ठिकाणी गौरी मला भेटायची. माझे आईवडील तिच्यावर खूप प्रेम करायचे. ती बंडखोर आणि भारतीय परंपरावादी पालकांची टीकाकार होती, तरीही आणि घटस्फोट झाल्यानंतरही…ती म्हणायची की तुमच्या घराण्याची पहिली सून हा सन्मान तू माझ्याकडून कधीच काढून घेऊ शकत नाहीस. माझी आई निवर्तल्यानंतर ती माझ्यासोबत अखंड होती अगदी सर्व विधी पूर्ण होऊन मी घरी येईपर्यंत. माझे तिच्या कुटुंबाशी असलेले बंध कायम राहिले. जरी आम्ही घटस्फोट घेतला, तरीही तिच्या वडिलांना, लेखक, नाटककार, चित्रपट निर्माते पी. लंकेश यांना मी भेटायचो. अमेरिकेतून भारतात आल्यावर त्यांना आवर्जून भेटायचोच. आम्ही मग राजकारण, धर्म, साहित्य, कृषी क्षेत्रातील विपन्नावस्था, आरोग्य आणि जग या विषयांवर चर्चा करायचो आणि भांडायचोही.पी. लंकेश 2000 मध्ये निवर्तले. त्यानंतर गौरी बाप बनली. तिच्या वडिलांचे वर्तमानपत्र ती चालवू लागली. विषमता, विसंगतीविरोधातील लढाई तिने सुरू ठेवली. याविषयी शंकाच नाही की ती विचारसरणींच्या पटावरील केंद्राच्या डाव्या बाजूला किंवा अगदी टोकाच्या डाव्या बाजूला झुकलेली होती. आमचा वादाचा मुद्दा हाच होता. ती म्हणायची तंत्रज्ञानाचे गोडवे गाऊ नकोस. मोबाइल फोन क्रांतीविषयी 1990च्या दशकात ती म्हणायची अरे! या देशातील गरीब काही मोबाइल खाऊ शकणार नाहीत. तिचं हृदय उजवं किंवा डावं नव्हतं. ते योग्य बाजूला होतं.
आठ वर्षांपूर्वी मी बंगळुरूमध्ये नवं घर घेतलं. तिने ठरवलं की याचं घर चालवायला एक व्यवस्थापक पाहिजे. तिने फोनवरच सांगून टाकलं, मी एका विधवेला आणि तिच्या दोन मुलींना तुझ्याकडे पाठवतेय. तुझं घर त्या नीट सांभाळतील. पोरींना शाळेत पाठव. त्यांची काळजी घे.तिने पाठवलेली रामक्का आजही आमच्याकडे आहे. तिच्या पोरी आशा आणि उषा शिकल्या. ग्रॅज्युएट झाल्या आणि नोकरीलाही लागल्या आहेत. आशा सिंडिकेट बँकेत काम करतेय, तर उषा एका स्वयंसेवी संस्थेत. अशा शेकडो आशा आणि उषा गौरी लंकेशने घडवल्या आहेत. आता हे लिहिताना माझं मन विभंगलेल्या स्मृतींची भली मोठी कढई बनलंय. गौरीला काय म्हणावं हेच निश्चित नाही. पण एक शब्दसमुच्चय सारखा सारखा मनात येतोय तो आहे…विस्मयकारक सहजसुंदरता. डावा, उजवा, हिंदुत्वविरोधी, सेक्युलर हे सगळे शब्द सोडा. माझ्यासाठी ती माझी मैत्रीण, माझं पहिलं प्रेम होती ती. गौरी माझ्यासाठी आहे विस्मयकारक सहजसुंदरतेचे स्मृतिस्थळ!
-चिदानंद राजघट्टा