धरणगाव। तालुक्यातील कल्याणेहोळ येथील महिलेचा विहिरीत आज सकाळी मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील कल्याणेहोळ येथील प्रताप गुलाब पाटील यांच्या गावानजिक विहिर आहे. या विहिरीवरून शेतात कामासाठी जाणारे शेतमजुर पिण्याचे पाणी भरायला जात असतात.
आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे काही शेतमजुर प्रताप पाटील यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना महिला विहिरीत पडलेल्या अवस्थेत दिसली. याबाबत त्यांनी तात्काळ येथील पोलिस पाटील उखर्डू दत्तू पाटील यांना कळविले. त्यानंतर पोलीस पाटील हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी गावकर्यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो गावातील सुमनबाई अशोक पाटील (वय 50) यांचा असल्याचे समजले. दरम्यान, सुमनबाई अशोक पाटील या आपल्या पती व एक विवाहित मुलासोबत कल्याणेहोळ येथे राहत होत्या. त्या काल रात्रीपासून घरातून काहीही न सांगता निघून गेल्याची माहिती पोलिस पाटलांनी दिली. परंतु त्या घरातून का निघून गेल्या याबद्दल नक्की कारण समजू शकले नाही. याबाबत धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.