जळगाव। तालुक्यातील आसोदा येथील तरूण गुरूवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास शेतात मक्याच्या पिकाला पाणी देत होता. पाणी देत असताना अचानक त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. त्यात त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुळचे आसोदा येथील दीपक भास्कर पाटील (वय 38, ह. मु. अरिहंत कॉलनी, गणेशवाडी) यांचे बी. जे. मार्केट परिसरात गणेश भरीत सेंटर आहे. तसेच त्यांची आसोदा शिवारात आव्हाणे रस्त्यावर शेती आहे.
पट्टीच्या पोहणार्यांनी काढला मृतदेह बाहेर
गुरूवारी सकाळी दीपक त्यांच्या शेतात मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. गुरूवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पाणी देत असताना विहिरीजवळ चिखलात त्यांचा पाय घसरला. त्यामुळे तोल जाऊन ते विहिरीत पडले. त्यावेळी आजुबाजुच्या शेतात काम करणार्यांना ते पडल्याचे दिसले. पळत जाऊन दीपक यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी गावातील पट्टीच्या पोहणार्यांना बोलावण्यात आले. दोन तासानंतर दीपक यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. या प्रकरणी तालुका पोलिस ठार्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबियांचा आक्रोश…
घटने विषयी माहिती मिळाल्यानंतर दीपक यांच्या कुटुंबियांनी सिव्हलमध्ये धाव घेतली. त्या ठिकाणी मृतदेह बघितल्यानंतर त्यांनी आक्रोश केला. दीपक यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा सोहम (वय 4) आणि मुलगी गायत्री (वय 6) असा परिवार आहे.