आमदार संजय सावकारे : पंचायत समितीत सरपंचांची बैठक
भुसावळ- विहिर अधिग्रहण किंवा टँकरसाठी प्रस्ताव असल्यास लागलीच या प्रस्तांवाना मंजुरी देण्यात यावी, अशह सूचना आमदार सावकारे यांनी येथे केली. तालुक्यातील टंचाई निवारणार्थ येथील पंचायत समिती कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आमदारांनी टंचाईग्रस्त गावांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना बैठकीत केल्या.
पाण्याची नासाडी रोखण्याचे आवाहन
याप्रसंगी गटविकास अधिकारी विलास भाटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा शाखा अभियंता एस.पी.लोखंडे, बांधकाम अभियंता एस.एम.पाटील आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील भीषण टंचाई जाणवत असलेल्या गावातील पाणी पुरवठ्याची स्थिती तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत शाखा अभियंता लोखंडे यांनी माहिती दिली तसेच महादेव माळ येथे पाण्याची समस्या गंभीर असल्याने याठिकाणी विहिरीचे खोलीकरण करण्यात आले असून पाईप लाइनद्वारे गावात पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. सरपंचांनी आपापल्या गावात पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे, गावातील नळांना तोट्या बसवाव्यात जेणेकरुन पाण्याची होणारी नासाडी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
अंदाजपत्रकासाठी अडवणूक केल्यास गाठ माझ्याशी -आमदार
तालुक्यातील गावांमध्ये चौदावा वित्त आयोग आणि दलित वस्ती योजनेच्या कामांचे अंदाजपत्रक बनविण्यासाठी ग्रामसेवक तसेच अभियंत्यांकडून टाळाटाळ केली जाते. काहींना तर यासाठी पैसे द्यावे लागतात. अशा तक्रारी उपस्थित सरपंचांनी मांडल्या. यावर आमदार सावकारे यांनी अधिकार्यांना धारेवर धरीत यापुढे अंदाजपत्रकासाठी कुणीही अडवणूक केल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, पुढील कामाचे नियोजन आपण स्वत: करणार असल्याचे सांगितले.