पारोळा तालुक्यातील सोके गावातील सापडला बिबट्या
जळगाव – पारोळा वनक्षेत्रातील परिमंडळ मोंढाळा नियतक्षेत्र दळवेलमधील मौजे सोके गावातील शेतकर्याच्या विहीरीत पडलेल्या नर जातीच्या बिबट्याला आज पारोळा वनविभागाच्या टिमने सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दळवेलमधील मौजे सोके येथील शेतकरी दयाराम रूपचंद पाटील यांच्या शेतातील गट नं. ८९ मधील विहीरीत नर जातीचा बिबट्या पडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा बिबट्या पाण्याच्या शोधार्थ परीसरात आला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान या बिबट्या विहीरीत पडल्याची माहिती मिळताच पारोळा वनक्षेत्रपाल व क्षेत्रीय कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहायक वनसंरक्षक केशव फंड यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला काढण्याचा प्रयत्न सुरू झाला.
खाटीच्या सहाय्याने बिबट्याला वर काढले
पारोळा वनपरिक्षेत्राचे आर.एस.दसरे यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी खाट विहरीत सोडण्याची सुचना केली. त्यानुसार सोके गावातील सरपंच अमोल पाटील, पोलीस पाटील देवाजी पाटील व ग्रामस्थांच्या सहकार्याने खाट विहीरीत सोडण्यात आली. विहीरीत पडलेल्या या बिबट्याने खाटीचा आधार घेतला. क्रेनच्या सहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहीरीत पिंजरा सोडण्यात आला. त्यानंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
बिबट्याची शारीरीक तपासणी
बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर पारोळा वनपरिक्षेत्र आवार येथे पशुवैद्यकीय अधिकारी ए.डी.पाटील, एम.जे. तळकर, एन.एम. गाडीलकर यांच्याकडून बिबट्याची शारीरीक तपासणी करण्यात आली. हा बिबट्या नर जातीचा असून ४ वर्षे वयाचा आहे. त्यास रात्रीच्या वेळे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे. या कार्यवाहीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस. दसरे, वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे, वनपाल एम.बी. बोरसे, बी.एन.पाटील, व्ही.एच. शिसोदे, पी.पी. पाटील यांनी सहकार्य केले.