भुसावळ- खासगी विजउद्योगांसोबत महानिर्मितीची स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणणे व दीपनगरातील संच एमओडीमुळे बंद होऊ नयेत, संच क्रमांक तीन एमओडीतून बाहेर यावा यासाठी प्रयत्न असल्याची माहिती नवनियुक्त मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी दिली. दीपनगर केंद्रातील चेमरी विश्रामगृहात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड, संचलन आणि संचालन विभागाचे उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्य अभियंता पंकज सपाटे म्हणाले की, दीपनगरातील संच क्रमांक ३ अंत्यत सुस्थितीत आहे. हा संच आजही कार्यान्वित करता येवू शकतो. मात्र मिरीट ऑर्डर डिस्पॅच अर्थात एमओडीमुळे हा संच बंद आहे. आमच्या महानिर्मितीची स्पर्धा सध्या राज्यातील खासगी वीजनिर्मिती उद्योगांसोबत आहे. आगामी काळात ही स्पर्धा देशपातळीवर असेल. यामुळे एमओडीपासून संच वाचविण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. दीपनगरातील संच क्रमांक तीनची प्रतीयुनिट खर्चाची रक्कम कमी करुन हा संच एमओडीतून बाहेर काढणे तसेच सध्या कार्यान्वित असलेल्या विस्तारीत प्रकल्पातील संच क्रमांक चार आणि पाचची प्रतीयुनिट रक्कम स्थिर ठेवून हे संच एमओडीत जाणार नाहीत, दीपनगर केंद्रातून कमी इंधनात अधिक वीजनिर्मिती करण्यावर भर राहिल. यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
प्रदूषणाचा प्रश्न सुटला
वेल्हाळे येथील प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सफल ठरलो आहोत. काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ भेट देवून उपायोजना केली जाते. यासह पाच किलोमिटर परिसरातील प्रदूषणाने बाधीत असलेल्या गावांना आम्ही सीएसआर फंडातून मुलभुत व विकासात्मक कामांसाठी निधी उपलब्ध करुन देत असल्याची माहिती यावेळी उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर यांनी दिली.
प्रकल्पाला येईल गती
दीपनगरातील ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम सध्या तांत्रिक कारणांनी संथ आहे. मात्र हे काम १ डिसेंबरपासून वेगाने वाढणार आहे. तब्बल ४ हजार २४२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम मे. भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड या कंपनीला दिले आहे. निश्चित कालावधीत हा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा महानिर्मितीचा मानस आहे, त्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती प्रकल्पाचे उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी यावेळी दिली.