वीजबिलातील दरवाढीमुळे उद्योगक्षेत्रात नाराजी

0

बारामती एमआयडीसीतील उद्योजकांनी नोंदवला निषेध

बारामती : दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी दरवाढ केली आहे. दरवाढ करून उद्योजकांना वीजदेयक बिले दिलेली आहेत. वीज वितरण कंपनीने केवळ 10 ते 12 टक्के दरवाढ करण्याचे घोषित केले होते. मात्र, 30 ते 40 टक्के दरवाढ झाल्याने उद्योग क्षेत्रात नाराजी पसरली आहे. त्यातच वीज कंपनीने चुकीच्या पद्धतीने पॉवर फॅक्टर आकारणी करून हजारो रुपयांचा दंड अनेक उद्योजकांना लावलेला आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात केलेल्या वीजदरवाढीचा बारामती एमआयडीसीतील उद्योजकांनी एकत्र येत निषेध नोंदविला.

बारामती चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता पडळकर यांची उद्योजकांनी नुकतीच भेट घेतली. अधिक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर यांना उद्योजकांनी चुकीच्या पद्धतीने आकारलेला पॉवर फॅक्टर दंड कमी करण्याची मागणी केली. तसेच, आकारलेल्या वीजदरवाढीमुळे महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यातील स्वस्त वीज दरामुळे बाजारात स्पर्धेसाठी कमी पडतील. परिणामी, हे उद्योग धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे दरवाढीमध्ये काही प्रमाणात तरी सवलत द्यावी, चुकीची बिले दुरुस्त करून मिळावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. तसेच नवीन पॉवर फॅक्टर सूत्र अंमलबजावणीपूर्वी उद्योजकांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने केली. यावेळी वीज वितरण कंपनीचे सहायक कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते, उद्योजक सचिन माने, पांडुरंग कांबळे, शहाजी रणवरे, कैलास शितोळे, भाऊसाहेब तुपे, आशिष पल्लोड, संजय थोरात, अरुण म्हसवडे आदी उपस्थित होते.

वीजदर जवळपास 10 रुपये प्रतियुनिट

ऑटोमोबाईल उद्योग बर्‍यापैकी चाललेला असताना नुकत्याच झालेल्या या वीजदरवाढीमुळे मोडकळीस येण्याची भीती आहे. उद्योग क्षेत्रासाठी गुजरातमध्ये 6 रुपये 20 पैसे प्रति युनिट, तर कर्नाटक मध्ये 7 रुपये 80 पैसे प्रतियुनिट वीज दर आहे. मात्र, या दरवाढीमुळे महाराष्ट्रात हाच वीजदर जवळपास 10 रुपये प्रतियुनिट झाला आहे. मला साधारण 1 लाख 45 हजारांच्या आसपास येणारे वीजबिल 1 लाख 85 हजारांवर गेले आहे. यावरून वीजदरवाढीची तीव्रता लक्षात येते. तसेच पॉवर फॅक्टर दंड आकारणी वीजबिलाएवढी करण्यात आल्याचे बारामती चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले. चुकीचा पॉवर फॅक्टर लावलेली सर्व बिले दुरुस्त केली जातील. तसेच, जादा रकमेच्या भरलेल्या बिलांना पुढील बिलांमध्ये वजावट मिळेल, असे आश्‍वासन अधिक्षक अभियंता पडळकर यांनी दिले.