वीजबिल ऑनलाइन भरण्यासाठी पथनाट्य

0

पुणे । महावितरणचे वीजबिल ग्राहकांनी ऑनलाइनद्वारे भरण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीआयटी) विद्यार्थ्यांचा पथनाट्यांद्वारे जागर सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी या पथनाट्यांचे प्रयोग होत आहेत.

महावितरणने वीजबिल ऑनलाइनद्वारे भरण्यासाठी वेबसाइट व मोबाइल अ‍ॅपद्वारे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. पुणे परिमंडलात सद्य:स्थितीत 6 लाख 60 हजार वीजग्राहक दरमहा 145 कोटी रुपयांचा ऑनलाइन भरणा करीत आहेत. ही संख्या आणखी वाढविण्यासाठी महावितरणकडून ऑनलाइन वीजबिल भरणा प्रोत्साहन उपक्रम सुरू आहे. यामध्ये योगदान देत व्हीआयटीच्या विद्यार्थ्यांनीही स्वयंस्फूर्तीने पथनाट्य बसविले असून त्याद्वारे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी ऑनलाइन वीजबिल भरण्याचा जागर सुरू केला आहे. तसेच आणखी 20 विद्यार्थी विविध सोसायट्यांमध्ये जाऊन मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजबिल भरण्याचे वीजग्राहकांना प्रात्यक्षिक देत आहेत.

रास्तापेठ येथे गुरुवारी (दि. 31) महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या पथनाट्याद्वारे व्हीआयटीच्या विद्यार्थ्यांनी मने जिंकून घेतली. यावेळी मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, सुंदर लटपटे, महेंद्र दिवाकर, विजय भटकर आदींची उपस्थिती होती. व्हीआयटीचे प्रा. राजेश ढाके यांच्या मार्गदर्शनात शिवम वळसकर, समृद्धी माने, आकाश नाईकवाडे, धनश्री अघोर, तन्वी गायकवाड यासह अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.