मुंबई: कोरोनामुळे आर्थिक संकट उभे असतानाच वाढीव वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त आहेत. ग्राहकांसह विरोधकांनी सरकारकडे वीजबिलात सूट मिळावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आता ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची, मागील तीन महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत व या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी सोमवार १० ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृति समितीतर्फे करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी प्रताप होगाडे, आर. के.पोवार व सर्वपक्षीय प्रमुख उपस्थित होते.
घरगुती ग्राहकांना कोरोनामुळे पोट भरण्याची समस्या असताना वाढीव वीजबिलामुळे आर्थिक अडचण निर्माण झाले आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण वीज बिल माफी करावी, अशी वीज ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे.
शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निलोफर आजरेकर या होत्या. या बैठकीमध्ये राजू शेट्टी, आमदार चंद्रकांत जाधव, प्रताप होगाडे, महेश जाधव, बजरंग पाटील, आर. के. पोवार, बाबा पार्टे, विजय सुर्यवंशी, चंद्रकांत यादव, बाबा इंदुलकर, अॅड. रणजित गावडे, महादेवराव आडगुळे, बाबासाहेब देवकर, भारत पाटील, दिलीप देसाई, राजेंद्र सुर्यवंशी, संदीप कवाळे, अॅड. राजेंद्र पाटील, विक्रांत पाटील किणीकर, समीर पाटील, विक्रम जरग, मारुतराव कातवरे आदी अनेक मान्यवर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.