वीजेच्या वेळापत्रकात बदल झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा

0

जैताणे । सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरु असून खुडाणे, डोमकानी व परिसरातील शेतकरी वर्ग विजेच्या गैरसोयीचे वेळापत्रकामुळे अडचणीत सापडला आहे. या परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण जैताणेद्वारे शेती पंपासाठी थ्री फेज वीज पुरवठा केला जातो मात्र हा वीज पुरवठा रात्रीच्या वेळेस करण्यात येतो. कांदा लागवड दिवसा व पाण्यात करावी लागते म्हणून रात्रीचा होणारा वीज पुरवठा हा दिवसा करण्यात यावा अशी मागणी खुडाणे ग्रामस्थांतर्फे सरपंच कल्पना गवळे यांनी केली होती. विजवीतरण कार्यालयाने देखील शेतकर्‍यांच्या तक्रारींची लागलीच दखल घेऊन भारनियमन वेळापत्रकात बदल करून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याबद्दल शेतकर्‍यांमधून आनंद व्यक्त होत आहे. थंडीचे दिवस आणि मजुरांची कमतरता वाढलेली मजुरी यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला होता. दिवसा वीज पुरवठा करून या भागातील शेतकर्‍यांची गैरसोय टाळावी अश्या आशयाचे मागणी निवेदन खुडाणे ग्रामस्थांनी अभियंता यांना दिले.

भूमिगत गटारकामांचे भूमिपूजन
खुडाणे गावात पूर्ण खुल्या पद्धतीच्या सांडपाणी गटारी होत्या त्यापासून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता परंतु या दोन वर्षात वार्ड क्र 1,2,3,4 या भागात ठिकठिकाणी सिमेंट पाईप व काही ठिकाणी भूमिगत गटारी तयार करून सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. वार्ड क्र 2 मध्ये आमदार डी.एस.अहिरे यांच्या स्थानिक विकास निधीतून 3 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याआधारे पूर्ण वार्ड हा गटारमुक्त होण्यास मदत होणार आहे. नुकतेच भूमिगत गटार कामाचे भूमिपूजन उपसरपंच नामदेव माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पराग माळी, ग्रा.प.स कन्हैया लाल काळे, महेंद्र हेमाडे, शालिग्राम देवरे, बबलू महाजन, मोहन वाघ, मनोज गवळे, दिनेश पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.