जळगाव । महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या व कृती समितीमधील संघटनेच्या वतीने वीज वितरण, परिषण व निमिर्ती या तिन्ही कंपन्यांमधील 32000 कंत्राटी व ऑउटसोसिंग कामगारांना कायम करण्यासहीत इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यभर कंपनीचे कार्यालयांसमोर निदर्शने करुन लक्ष वेधण्यात आले. अनेक वेळा चर्चा, उपोषणे, आंदोलने मागण्या करुन सुद्धा फक्त कमिट्या नेमण्याच्या प्रशासनाच्या वेळ काढूपणाच्या भूमिकेचा यावेळी निषेध करुन, प्रशासन किती उदासिन आहे, म्हणून हे आंदोलन पुढील काळात तीव्र करुन मागण्यावर लक्ष वेधून प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडू, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विरेंद्रसिंग पाटील सर्कल सेके्रटरी जळगाव यांनी मार्गदर्शन केले. अरुण शेलकर उपमुख्य औद्योगिक संबंध अधि. जळगाव परिमंडळ यांना संयुक्त कृती समितीचे निवेदन देवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याविषयी सुचविण्यात आले.
मुख्य कार्यालयाकडे निवेदन
आज झालेल्या आंदोलनानंतर 15 मेपर्यंत कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्नमार्गी न लागल्यास 22 मेपासून बेमुदत कामबंद करण्याचा इशारा दिला आहे. महावितरण, महानिर्मिती, महा परिषण या तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांना नोटिस दिली आहे. नोटीस देऊन सुद्धा उर्जामंत्री व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन चर्चा सुद्धा करत नसल्याने मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांचेमार्फत मुख्य कार्यालयाकडे निवेदन पाठविण्यात यावे.
निदर्शने करण्यासाठी यांचा सहभाग
या सभेत पी.एम.कडकमोल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्कल अध्यक्ष भगवान सपकाळे, जयसिंग जाधव, देविदास सपकाळे, झोन प्रसिद्ध प्रमुख, झोन खजिनदार योगेश तावडे, मुकेश बारी, रमेश निकम, दिनेश बडगुजर, प्रमोद ठाकूर, संतोष सोनवणे, खेमचंद्र चौधरी, विजय वराडे, संतोष ठाकूर आदी प्रतिनिधी उपस्थित होते. सर्कल सेके्रटरी विरेंद्रसिंग पाटील, प्रमुख सल्लागार जयसिंग जाधव, विभा.सचिव मुकेश बारी, आउटसोसिंग प्रतिनिधी संतोष सोनवणे, प्रमोद ठाकूर, खेमचंद्र चौधरी, विजय वराडे आदींनी सहभाग घेतला.