वीज, कर्जमाफीतही सरकार अपयशी

0

अहमदनगर । कर्जमाफी खूप दूरची गोष्ट आहे. अजून कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. ऑनलाईन प्रक्रियेत ज्येष्ठांचे ठसे उमटत नाहीत. एक महिन्याचा कोळसा साठवून ठेवला होता, असे सरकारनेच जाहीर केले होते. तो गेला कुठे? असा सवाल करीत वीज, महागाई आणि कर्जमाफीबाबत सरकार अपयशी ठरले असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरमध्ये केली.

‘वन नेशन -फाईव्ह टॅक्स’
येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात संवाद यात्रेनंतर खा. सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी आक्रमकपणे मोर्चा- आंदोलने करीत आहेत. आम्हाला जनतेला त्रास द्यायचा नाही, या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. सरकारने घाईघाईत कर्जमाफी केली. मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होताच जाहिरातीचे बोर्ड लागले. तसे भारनियमनाबाबतही झाले पाहिजे. 24 तास वीज मिळाली पाहिजे. सरकारकडे भारनियमनाबाबत कोणतेही नियोजन नाही. कर्जमाफीतही अनेक अडचणी आहेत. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन टॅक्स’ जाहीर केले. ही संकल्पना मुळात आमचीच आहे. परंतु सरकारने आता वन ऐवजी फाईव्ह टॅक्स केले आहेत.

चौकशी राजकीय हेतुने प्रेरीत नसावी
सुनील तटकरे यांच्या चौकशीबाबत त्या म्हणाल्या, सरकारने चौकशी जरुर करावी. परंतु ती राजकीय हेतुने प्रेरीत नसावी. भगवानगडावरील दसरा मेळाव्याबाबत सुळे यांचे लक्ष वेधले असता, त्याबाबत आपला अभ्यास नसल्याचे सांगून सुळे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. बारमतीवर सर्वांचेच प्रेम आहे. बारामतीत जे काही बोलले जाते, ते देशभर जाते. तसेच ही संवाद यात्रा म्हणजे निवडणुकीची तयारी नसून युवकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आहे. युवक जे बोलतात, तेच आम्ही संसदेत बोलणार, असे त्या म्हणाल्या.