वीज कर्मचार्‍यास मारहाण करणार्‍यांवर गुन्हा

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील पातोंडी येथे वीजचोरी व आकडे टाकलेल्यांवर कारवाई करत असताना वीजचोरांकडून पथकावर दगडफेक करत अंतुर्लीच्या कनिष्ठ अभियंत्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवार 5 रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली. रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्यात आला. महिनाभरापासून विद्युत वितरण कंपनीतर्फे वीजचोरीवर आळा घालण्यासाठी भरारी पथक नेमले असून विविध ठिकाणी धाडी घालत दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जात आहे.

आकडे टाकणार्‍यांवर कारवाई
महावितरणचे पथक पातोंडी येथे कारवाईसाठी अचानक हजर झाले. पथकात अंतुर्लीचे कनिष्ठ अभियंता सचिन आठवले, शीतल तायडे, जमुना तडवी, मुकेश सनांसे, विजय केळकर, खलील तडवी, आशिष पाटील यांचा समावेश होता. या वेळी गावाच्या सुरुवातीच्या भागात मोठ्या प्रमाणात तारांवर आकडे टाकल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई सुरू झाली. काही वेळातच जमाव जमून पथकाला शिव्या देत आरडाओरड करू लागले. यावेळी संतोष ज्ञानेश्वर शिरतुरे, पांडुरंग वाघ, संदेश शंकपाळ, अजय वाघ, शुभम पानपाटील, राहुल शंकपाळ, सांडू वाघ व कैलास शिरतुरे यांनी पथकावर दगडफेक करत चारचाकी (एमएच 19- एपी 5121) वर दगड तसेच लाथा मारुन गाडीचे नुकसान केले. त्यानंतर अंतुर्लीचे कनिष्ठ अभियंता सुरेश हरिश्चंद्र आठवले यांना मारहाण करायला सुरुवात केले. याप्रसंगी सरपंच यांनी त्यांना घरात घेतल्यानंतर पुढील अनर्थ टळला. यासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांवर कडक कारवाईचे संकेत पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.