गडचिरोली । वीज कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मूलचेरा तालुक्यातील धन्नूर येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. जखमींना आष्टी गामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धन्नूर येथे शामराव मुन्नी कान्नाके यांच्याकडे जय पेरसापेन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी नातेवाईक उपस्थित होते.
आश्रय घेतलेल्या झाडावरच वीज कोसळ्याने दुर्घटना
कार्यक्रम संपल्यानंतर क्षणी वातावरणात बदल झाला आणि आभाळात मेघगर्जना सुरू झाली. त्यामुळे धन्नूर आणि धन्नूर टोला मधोमध असलेल्या एका झाडाखाली लोकांनी आश्रय घेतला. पण आश्रय घेतलेल्या झाडावरच वीज कोसळल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. शामराव मुन्नी कान्नाके हे पोलीस दलात कार्यरत असल्याचे समजते. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला तर संदीप शिवराम कुसनाके (वय 30) या व्यक्तीचा आष्टी रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यावर वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यू झालेल्यामध्ये संदीप शिवराम कुसनाके (वय 30), रितेश शामराव कान्नाके (वय 25), जाणिकराम लालू तोडसाम (वय 43), शामराव मुन्नी कान्नाके (वय 58), तर जखमीमध्ये लचमा मंगा कान्नाके (रेंगेवाही), दिपक तुळशीराम कुसनाके, लक्ष्मण सोमा तोरे, विलास मारोती आत्राम, दिवाकर गिरमा तलांडे, रमेश मुरलीधर कुसनाके, आकाश विलास कुसनाके यांचा समावेश आहे. सर्वांना गामीण रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये विशेष म्हणजे पोलीस शामराव मुन्नी कान्नाके हे पुढील 2 महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.