वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू

0

गुरुवारी वेल्हाळेत वीज पडल्याने सहा गुरांचा झाला होता मृत्यू

धाबे शिवारात विजेचा तडाखा : कुर्‍हेपानाचे गावातही चौघे भाजले

भुसावळ । उत्तराच्या मुसळधार पावसासोबत वीज कोसळल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे शिवारात शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला तर भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथेही वीज कोसळल्याने चार जण भाजल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. गुरुवारी वेल्हाळेत वीज पडल्याने सहा गुरांची मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच सलग दुसर्‍या दिवशी ही घटना घडल्याने घबराट पसरली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील न्हावी शिवारात आसाराम देवसिंग भिलाला (५०) हा शेतमजूर टेकडीवर उभा असतांना वीज त्याच्या अंगावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

यांनी केली वेळीच मदत
गावातील राजेंद्र बडगुजर, विनोद शिंदे, नाना गांधेले, दिनेश गांधेले, मुकेश गांधेले यांनी लागलीच धाव घेऊन जखमींना पालिका रुग्णालयात दाखल केले. यात देवचंद गांधले व निवृत्ती बाविस्कर यांचे पाय, मांड्या भाजल्या गेल्या तर सोपान वाघ व मुकेश ठाकरे यांची पाठ व छाती भाजली गेली असून या दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काल असाच परीसरात विजेच्या फडक्याने सहा गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

परीसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण
विजेचा तडाखा इतका जोरदार होता की भिलाला यांच्या खिशातील सुटे नाणेदेखील विरघळले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे वीज पडून गुरे चारण्यासाठी गेलेले चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, १५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. त्यातील दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कुर्‍हेपानाचे येथील देवचंद गांधेले (वय ६५), निवृत्ती दयाराम बाविस्कर (वय ६०), सोपान सुका वाघ, मुकेश सुपडू ठाकरे हे गुरे चारण्यासाठी गेले असता जोरदार पाऊस सुरू झाल्याने ते जवळच असलेल्या चौरंगीनाथ मंदिराच्या आडोशाला उभे राहिले. यादरम्यान जोरदार वीज कडाडून मंदिर परिसरात पडली. यात चौघे गंभीर जखमी झाले.