4 जण जखमी, यवतमाळ व सोलापूरमधील घटना
यवतमाळ/सोलापूर : पाऊस आल्याने झाडाखाली थांबलेल्यांवर वीज कोसळल्यामुळे चार जण ठार तर चौघे जखमी झाले. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारात घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर जिल्ह्यातही वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील चिंचोली येथे रविवारी दुपारी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. वीज पडल्याने शेतात काम करणारे अलाउद्दीन दस्तगीर बेनुरे (वय 52) हे जागीच ठार झाले.
महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारात आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. त्यावेळी तेथून जात असलेल्या काही ग्रामस्थांनी पावसापासून बचावासाठी झाडाखाली आसरा घेतला. पण दुर्दैवाने ते सर्वजण ज्या झाडाखाली उभे होते, तिथेच वीज कोसळली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.