वीज तारा तुटल्या, हानी टळली

0

भुसावळ। शहरातील रेल्वे लोखंडी पुलासमोरून गेलेल्या 11 केव्ही वीज वाहिनीवर निंबाच्या झाडाची फांदी अचानक कोसळल्याने शॉर्ट सर्किटने होवून स्पार्किंग झाल्याची घटना शनिवार, 5 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यावेळी या भागातून वाहनधारकांची वर्दळ कमी असल्याने अप्रिय घटना टळली. या प्रकारामुळे या भागातील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली. वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा खंडित करीत दुरुस्तीचे काम हाती घेतले.

शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास व्यापारी संदीप देवडा यांच्या दुकानाशेजारील निंबाच्या झाडाची फांदी अचानक 11 केव्ही वीज लाईनवर पडल्याने वीज वाहक तारा रस्त्यावर पडल्या. याचवेळी वेळी एक टेम्पो तसेच दुचाकीस्वार या भागातून जात असताना त्यांनी प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने जीवीतहानी टळली. या प्रकारानंतर बराचवेळ वीज तारांमध्ये स्पार्किंग सुरू असल्याने व ठिणग्या उडत असल्याने येणार्‍या-जाणार्‍या वाहनधारकांसह या भागातील व्यापारीवर्गात चांगलीच धास्ती निर्माण झाली. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या प्रकाराची माहिती कळवल्यानंतर कर्मचार्‍यांनी तातडीने धाव घेत या भागातील वीजपुरवठा खंडित केल्याने अप्रिय घटना टळली.

4 तास वाहतूक ठप्प, वाहनधारकांचे हाल
11 केव्ही वीज वाहक तार तुटल्याने वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने लोखंडी पुलाकडून जाणारी वाहतूक ओंकारेश्‍वर मंदिराकडून गावात वळवण्यात आली. या प्रकारामुळे वाहनधारकांनादेखील तब्बल 4 तास चांगलाच मनस्ताप सोसावा लागला तर हंबर्डीकर बेकरीजवळ दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्रही दिसून आले.

उपनगराध्यक्षांनी घेतली धाव
सोशल मिडीयावर झालेल्या प्रकाराची माहिती व्हायरल झाल्यानंतर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. जमिनीवर पडलेल्या निंबाच्या झाडाची फांदी तातडीनेउचलण्याची सूचना त्यांनी करीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य केले.

सायंकाळी वाहतूक पूर्ववत
सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तुटलेल्या 11 केव्ही वीज वाहक तारेची पूर्ववत जोडणी करून वीजपुरवठा सुरळीत केला तर रस्त्यावर पडलेली निंबाच्या झाडाची फांदी बाजूला केल्यानंतर वाहनधारकांना दिलासा मिळाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

थोडक्यात बचावले वाहनधारक
शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घटना घडली त्यावेळी सुदैवाने या भागातून वाहनधारकांची वर्दळ अत्यल्प होती शिवाय शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीदेखील वर्दळ नसल्याने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. एरव्ही नेहमीच गजबज असलेल्या लोखंडी पुलाजवळ दिवसभर वाहनधारकांची गर्दी असते मात्र आजच्या घटनेप्रसंगी वर्दळ नसल्याने व सुदैवाने काहीही अप्रिय घटना न घडल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले.