एरंडोल । कपाशीला पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकर्यांचा विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी 8 जून रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील विखरण येथे घडली असून या घटनेमुळे परीसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. एरंडोल पोलिस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील विखरण येथील तरूण शेतकरी दिलीप प्रताप महाजन (वय 32) हा त्याच्या उमरदे शिवारातील शेतात कपाशीला पाणी भरण्यासाठी गेला होता. कपाशीला पाणी भरत असतांना वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे तो डीपी जवळ गेला असता त्याठिकाणी तुटून पडलेल्या वीज तारेचा त्यास स्पर्श झाल्याने तो जागीच मरण पावला.
विजेचा धक्का लागल्यानंतर त्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयत दिलीप महाजनच्या पश्चात पत्नी, तीन वर्ष व सहा महिने वयाची दोन मुले, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. मयत दिलीप हा शेतीचे काम करून डॉ.राहुल पाटील यांच्याकडे कंपाउंडर म्हणून कामास होता. याबाबत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.खताने यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.