वीज तार अचानक तुटल्याने म्हशीचा मृत्यू

A buffalo died as soon as the power line broke in Sukli : Fortunately, the couple survived सुकळी : गावातील ग्रामपंचायत शेजारील सार्वजनिक जागेत बांधलेल्या दुभत्या म्हशीच्या अंगावर अचानक विद्युत प्रवाह वाहून नेणारी वीज तार तुटून पडल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत शेतकरी दाम्पत्य सुदैवाने बचावले आहे.

म्हशीचा तरफडून मृत्यू
सुकळी गावातील शेतकरी प्रमोद भागवत पाटील यांनी आपल्या मालकिची दुभती म्हैस ग्रामपंचायत शेजारील सार्वजनिक जागेत बांधली होती मात्र मंगळवारी पहाटे अचानक वीज वाहक तार तुटून म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हैस जागीच दगावली. ग्रामस्थ गोकुळ कोळी घटनास्थळावरुन जात असतांना त्यांच्या लक्षात हा प्रकार आला.

सुदैवाने बचावले दाम्पत्य
घटना घडण्याच्या काही मिनिटे आधी पशू पालक प्रमोद पाटील हे पत्नी दुर्गाबाई यांच्यासह म्हशीचे दुध काढण्यासाठी आले होते मात्र म्हशीने दुध न दिल्याने दाम्पत्य घरी परतले तर तितक्यात ही दुर्दैवी घटना घडली मात्र सुदैवाने या घटनेत दाम्पत्य बचावले आहे. घटनेची माहिती कळताच महावितरणचे अभियंता ललित पटेल, तंत्रज्ञ समाधान धनगर, कर्मचारी दिलीप जाधव, ईश्वर धनगर आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत लोंढे यांनी सहकार्‍यासह मृत म्हशीचे शवविच्छेदन केले.
दरम्यान पशुपालक प्रमोद पाटील यांचे मोठे नुकसान झाले असून भरपाई मिळण्यात यावे, अशी मागणी होत आहे.