वीजबिल भरणा केंद्र दि. 10 व 11 रोजी सुरु राहणार
बारामती : बारामती मंडलातील सर्व वर्गवारीतील वीजथकबाकीदारांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम सुरू आहे. थकबाकी न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात असून कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी ग्राहकांनी तातडीने आपल्या वीजबिलाचा थकबाकीसह भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच मोहिमेदरम्यान वीजबिल भरण्यासाठी गैरसोय होऊ नये याकरिता बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि. 10 व 11 मार्चला सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.
शुन्य थकबाकी मोहिम
सद्यस्थितीत महावितरणची थकबाकीदारांविरोधात ‘शून्य थकबाकी मोहीम’ सुरू आहे. सर्व वर्गवारीतील थकबाकीदार वीजग्राहकांना थकबाकी भरण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. जे ग्राहक थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कठोर कारवाई सुरू आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीसह चालू बिलाचा भरणा करणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागणार आहे. सुटीच्या दिवशीही मोहीम चालू असल्याने त्यादिवशी ग्राहकांना वीजबिल भरता यावे यासाठी बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दुसरा शनिवार (दि.10) व रविवारी (दि. 11) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
ऑनलाईन सुविधा उपलब्द
अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह संकेतस्थळावरुन तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय ग्राहकांना 24 तास उपलब्ध आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीजबिलाचा एसएमएस पाठवला जातो. छापील बिलांऐवजी मोबाईलवर आलेला एसएमएस दाखवून कोणत्याही अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर बिल भरता येते. त्यामुळे ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीसह चालू देयकांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सुनिल देवधर यांचे बारामतीशीही नाते
बारामती : पूर्वांचल राज्यातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या भाजपाच्या राज्यातील विजयाचे शिल्पकार सुनिल देवधर हे आता सर्वांनाच परिचित झालेले आहेत. सुनिल देवधर यांचा बारामतीशीही ॠणानुबंध व स्नेहबंध जुळल्याच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. सन 1998 च्या दरम्यान देवधर हे बारामतीमध्ये बरेच दिवस संघाच्या प्रचार कार्यासाठी होते. त्यामुळे बारामतीकरांचे व देवधर यांचे स्नेहबंध असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्यांनी आठवणी काढून व्यक्त केले.
1998 साली संघकार्याच्या प्रचारासाठी बारामती येथे आले होते. महाराष्ट्रातील तालुका पातळीवर संघकार्याचा अभ्यास करण्याची जबाबदारी देवधर यांच्यावरती होती. त्यावेळी देवधर हे बारामतीमध्ये बराच काळ होते. पूर्वांचल राज्यातील जबाबदारीपूर्वी महाराष्ट्राचा तालुका पातळीवरचा अभ्यास सखोल पध्दतीने देवधर यांनी केला या अभ्यासाचा फायदा पूर्वांचल राज्यामध्ये देवधर यांना झाल्याचेही सांगण्यात आले. पूर्वांचल राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रात व्यवस्था केली होती. या व्यवस्थेचा एक भाग म्हणून देवधर यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी होती.पूर्वांचल राज्यात बारामतीतील संघाचे जेष्ठ कार्यकर्ते हनुमंतराव कोकरे यांचे चिरंजीवही कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पुर्वांचल राज्यातील विधानसभेतील बाबु कोकरे यांचाही सहभाग होताच देवधर यांच्याबरोबरच कोकरे हेही या निवडणूकीत महत्त्वपूर्ण काम करीत होते. मदत होईल. असे बारामतीकरांनी सांगितले.