पुणे । महावितरणकडून ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा झटका बसणार आहे. वीजदर वाढीसंदर्भात महावितरणने नुकतीच एक याचिका महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे केली आहे. या याचिकेमध्ये वीज दरात सरासरी 21 टक्के दरवाढीची मागणी करण्यात आली आहे.महावितरण कंपनीच्यावतीने दरवर्षी मध्यावधी फेरआढावा याचिका सादर केली जाते. ही याचिका आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येते. नुकतीच ही याचिका महावितरणने आयोगाकडे पाठविली आहे. त्यात त्यांनी आगामी दोन वर्षांत महावितरणच्या महसूलात तब्बल 29 हजार 415 कोटी वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वीज प्रतियुनिट दरात तब्बल 1 रुपये 37 पैसे इतकी दरवाढ ग्राहकांना सोसावी लागणार आहे.
दरवाढ विकास विरोधी
प्रत्यक्षात आता महावितरणने सूचविलेली दरवाढ ही इतर राज्यांच्या मानाने सर्वाधिक आहे. राज्यातील वीज ग्राहकांचे दर देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत. आपल्याकडील औद्योगिक दर हे शेजारील सर्व राज्यापेक्षा 25 ते 30 टक्यांनी जास्त आहेत. अशा स्थितीत पुन्हा दरवाढ लादली गेल्यास त्याचा परिणाम उद्योगांवर होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ विकास विरोधी आणि विनाशक ठरणारी आहे. राज्य सरकारचे दरवर्षी 1800 कोटी आर्थिक अनुदान वीज न देता लाटले जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा या दरवाढीचा चांगला फटका बसणार आहे. शहरी भागांत आधीच जादा दर आकारला जातो आता आणखी दरवाढ म्हणजे कंबरडे मोडण्यासारखे आहे.
ग्राहक संघटनेचा विरोध
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने वीज दरवाढीला विरोध केला आहे. वीज गळतीमधील टक्केवारी भरून काढण्यासाठीच ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महावितरण ही दरवाढ म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडणारी असून आयोगाच्या सुनावणीवेळी ही दरवाढ कशी फसवी आहे. याबाबतची आकडेवारी सादर केली जाणार आहे. महावितरण कंपनीने खरी गळती मान्य करून ती कमी करणे हे हिताचे ठरणार आहे.
जनहीत सुनावणी होणार
महावितरणच्या वीजदरवाढीच्या या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामकआयोगाकडून जनहित सुनावणी होणार आहे. ही सुनावणी झाल्यानंतरच वीजदरवाढीची याचीका मान्य करायची किंवा नाही या संदर्भात निर्णय घेतला जाणार असुन जणहित सुनावणी नंतरच वीजदरवाढी संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
सर्वसामान्याचे आणखी हाल
सध्या तेलाच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले असताना वीजदरवाढीचा महावितरणचा प्रस्ताव सर्वसामान्यांना शॉक देणारा आहे. सध्या महागाईने कळस गाठला असून सर्वसामान्य नागरीक हैराण झाले आहेत, त्यातच प्रस्तावित दरवाढ वीज ग्राहकांच्या खिशाला आणखी चाट लावणार असे दिसत आहे.