वीज देयकांबाबतच्या अफवावर ग्राहकांनी विश्वास ठेऊ नये

0

जळगाव: महावितरण ही एक सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत वितरण कंपनी आहे. महावितरणकडून वीज बिलात कुठलीही आकारणी छुप्प्या स्वरूपात वा मनमानी पद्धतीने केली जात नाही. विद्युत नियामक आयोगाने मंजूर केलेल्या दरानुसारच वीज देयके आकारते. वीज देयकसंदर्भाने सोशल मिडियावरून फिरणारा संदेश ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे. तेंव्हा ग्राहकांनी वाढीव वा चुकीची वीज देयके दिल्याच्या अफवावर विश्वास ठेऊ नये, असे महावितरणचे आवाहन आहे.

महावितरणने कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मीटर रिडींग , वीज देयके वाटप बंद ठेवले. ग्राहकांना सरासरी वीज देयके दिली. मात्र आता प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी मीटर रिडींग घेणे सुरू केले आहे. ग्राहकांना मीटर रिडींग नुसार तीन महिन्याचे एकत्रित देयक स्लॅब बेनिफिट सह देण्यात आले आहे. ग्राहकांनी यापूर्वी एप्रिल, मे महिन्याची सरासरीनुसार प्राप्त देयके भरली असल्यास त्याची वजावट करून देयक दिले आहे. त्यामुळे तीन महिन्याचे मीटर रिडींग नंतरचे देयक असल्याने देयकाची रक्कम अधिक दिसत असल्याने देयकच चुकीचे आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. ग्राहकांनी आपल्या वीज मीटरवरील रिडींगची खात्री करून घ्यावी. वीज देयकाच्या मागील बाजूस दिलेल्या वीज वापराच्या टप्प्यानुसारचे दर व वीज देयक गणना करून पहावी.
आपण मागच्या वर्षीच्या उन्हाळ्याचा वापर आणि चालू वर्षातील टाळेबंदीमध्ये २४ तास घरात राहून केलेला वापर यांची तुलना केली तर आपल्याला दिसून येईल की, यावर्षीचा वापर हा मागच्या वर्षीच्या वापराच्या तुलनेत बरोबर आहे.
सोबत दिलेल्या लिंकवर आपला ग्राहक क्रमांक टाकून देयक गणना समजून घ्या.
https://billcal.mahadiscom.in/consumerbill/

दिवसेंदिवस कोरोनाच्या बाधितांची संख्या वाढत आहे. वीज देयके चुकीची असल्याचा गैरसमजुतीने ग्राहकांनी महावितरण कार्यालयात गर्दी करू नये. आपले वीज देयक समजून घ्यावे.ऑनलाईन पद्धतीने घरूनच महावितरण मोबाईल अँप वा संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलवर वीज देयकाबाबत तक्रार असल्यास ती करावी.