किन्हवली । किन्हवली येथील एका स्टोन क्रशरला वाचविण्यासाठी वीज पारेषण कंपनीची अतिऊच्च दाबाची वीज वाहिनी शेतातून नेण्याविरोधात पीडित अल्पभूधारक शेतकरी कुटुंबियाने मंगळवारपासून आपल्या शेतावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. किन्हवली येथील सोनार कुटुंबियांची सर्व्हे क्रमांक 26/3/2 व 30/2 या भूक्षेत्रात 99 गुंठे सामाईक शेती व वरकस आहे.वीज पारेषण मंडळाने या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता दमदाटी करत त्यांच्या जागेतून 400 के व्ही ची अतिऊच्च दाबाची वीज वाहिनी नेण्याचा घाट घातला आहे.
यात या अल्पभूधारक सोनार कुटुंबाची सर्व जमीन संपादित होत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या शेतजमिनीच्या बाजुला भिवंडी येथील एका धनिकाचे ओम साई स्टोन क्रशर व बाजूलाच बिगर शेती परवाना मिळालेला भूखंड आहे. हा भूखंड आणि स्टोन क्रशरला कुठली अडचण येऊ नये म्हणून वीज मंडळाच्या पारेषण कंपनीच्या अधिकार्यांनी नियोजित जागा बदलून 40-50 फुटांवर असलेल्या सोनार कुटुंबीयांच्या जागेतून अतिऊच्च दाबाची विजवाहिनी नेण्याचा घाट घातला असल्याचा आरोप बाधित सोनार कुटुंबाने केला आहे. वीज वाहिनीचा सर्व्हे करताना या शेतकर्यांनी विरोध केला असता त्यांना नवी मुंबई येथील पारेषण कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता समीर कांबळी यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोपही या कुटुंबाने केला आहे.
सगळ्यांकडून बेदखल झाल्यामुळे उपोषणाचे हत्यार
याबाबत न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील आणि शहापूर तहसीलदार यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर किन्हवली येथील बाधित अल्पभूधारक शेतकरी अनंत हरिभाऊ सोनार(88), मोरेश्वर हरिभाऊ सोनार, दिगंबर हरिभाऊ सोनार, शैलेश दिगंबर सोनार, महेश दिगंबर सोनार व किशोर अनंत सोनार असे सहा शेतकरी मंगळवारपासून शेतावर आमरण उपोषणास बसले आहेत. दरम्यान, अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटना व ग्रामस्थ यांंनी पाठिंबा दिला आहे.