वीज पुरवठा विषयक कामांसाठी वारंवार होतोय खोळंबा; पुर्णवेळ महावितरण अभियंता हवा

0

विद्युत सनियंत्रण समिती सदस्य सौंदणकर यांची मागणी

देहू : आषाढीवारीसाठी जगत्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा महिनाभरावर आला असला तरीही महावितरण कंपनीकडून देहुगावाला पूर्णवेळ अभियंता न मिळाल्याने वीज पुरवठा विषयक कामांसाठी खोळंबा होत आहे. सध्या तळवडेतील एका अभियंत्याकडे देहुचा प्रभारी कारभार देण्यात आला आहे. मात्र हा अभियंता पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी महावितरणला निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा
सौंदणकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, देहूगावात कायमस्वरूपी शाखा अभियंता नेमण्याची मागणी मागील दोन वर्षांपासून होत आहे. तत्कालीन मुख्य अभियंत्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी त्याठिकाणी अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांतच अभियंता काम सोडून गेले. तेव्हापासून आजतागायत देहूगाव शाखा कार्यालयात कायम स्वरूपी अभियंता कार्यरत नाही. देहूगाव हे अ दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. पुढील महिन्यात जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक, वारकरी याठिकाणी येणार आहेत. अशावेळी पालखी सोहळ्यात तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास तसेच इतर काही घटना घडल्यास गोंधळाची स्थिती निर्माण होवू शकते.

अभियंत्यांच्या 35 जागा रिक्त
महावितरणकडे सर्वच परिमंडळांमध्ये अभियंत्यांची वाणवा आहे. पुणे परिमंडलात अभियंत्यांच्या सुमारे 35 जागा रिक्त आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार संतोष सौंदणकर यांनी केली आहे. पुणे प्रादेशिक संचालकांनी बदल्यांमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त जागा भरताना पुणे प्रादेशिक संचालकांना नियुक्तीचे कोणतेही अधिकार न देता ही पदे थेट मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडून निष्पक्षपणे करण्यात यावी, अशी मागणीही सौंदणकर यांनी केली आहे.