मुक्ताईनगर – कोरोना लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिल कमी न करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी जाहीर केल्यांनंतर त्यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही आता घुमजाव करत जेवढे बिल आले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. यावर भाजप खासदार रक्षा खडसे आक्रमक झाल्या असून सरकारने यासंदर्भात योग्य भूमिका घेतली नाही, तर त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिल माफ करू, असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र त्यांनी आता घुमजाव केले आहे. ऊर्जामंत्र्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकत नसले तरी, काही प्रमाणात का होईना ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलनं करावी लागत आहेत. कारण भाजप हा वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहे, असेही खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.
राजू शेट्टींसह भाजपा आक्रमक
या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत वारंवार सांगत होते, आम्ही काही ना काही मदत करू, दिवाळीला गोड बातमी देऊ, सक्तीची वसुली करा ही गोड बातमी? सरकारमधील मंत्री अशाप्रकारे बेजबाबदार विधान करत असतील तर सरकारवरचा आणि मंत्र्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडेल, आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. वाढीव वीज बिलाबाबत दिलासा दिला जाईल, असे वारंवार सांगणारे ऊर्जा मंत्री राऊत यांनी त्या बाबत यू-टर्न घेऊन ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला. राऊत यांच्याविरुद्ध विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल, खोटारड्या सरकारला हजार व्हॉल्टचा शॉक देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तर महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या श्रेयवादात वीज बिल सवलत अडली, असा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.