मुंबई – घरगुती ग्राहकांसाठी जून 2020 चे वीजबिल भरण्याबाबत दिलासा देण्यात आला असून, त्यांना 3 एकसमान हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास 2 टक्क्यांची सूट वीज बिलामध्ये देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी वीजबिल अधिक येण्यामागची कारणे व ग्राहकांना दिलासा देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सविस्तरपणे दिली.
वीज नियामक आयोगाने कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची प्रत्यक्ष जागेवर जावून मीटरवाचन व वीजबिल वितरण न करण्यास महावितरणला आदेश दिले होते. एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्यात आलेली आहेत.
जून-2020 मध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात (एप्रिल व मे महिना) आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने (डिसे. जाने. व फेब्रुवारी ) हिवाळयातील वीज वापरावर दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात वाढ झालेली आहे, जी माहे जून-2020 च्या बिलात दिसून येते आहे, असे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत. त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहकांनी ईमेल आयडी energyminister@mahadiscom.in व मोबईल क्र. 9833567777 व 9833717777 यावर संपर्क साधावा.
आधी बिल भरले असल्यास त्यावरही 2 टक्के सूट
वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना कोणतीही गरज नाही. कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन वीज बिलाच्या कमीत कमी 1/3 रक्कम त्यांना भरता येईल. तसेच ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेचे वीजबिल भरले असल्यास, त्यांना देखील 2 टक्के सूट त्यांच्या वीजबिलामध्ये देण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष रीडिंग घेणार
जे घरगुती ग्राहक लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी गेल्यामुळे त्यांचा वीजवापर हा अगदी कमी झाला आहे तरी त्यांना मीटर रीडिंग न घेतल्यामुळे मागील वीज वापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले आहे. अशा ग्राहकांच्या वीजमीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन, त्यांचे वीजबिल दुरूस्त करण्यात येतील.