वीज बिलामध्ये होत हेरफेर ; धुळ्यात ठिय्या आंदोलन

0

धुळे : भारतीय युवक काँग्रेसतर्फे वीज बिलामध्ये होत असल्याले हेरफेर व ग्राहकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंगळवारी सकाळी 11 वाजता साक्री रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शाब्दीक वाद होऊन खूर्च्या अस्ताव्यस्त करण्यात आल्या तसेच वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर शाई फेकण्याचाही प्रयत्न करण्यात झाला परंतु पोलिसांनी आंदोलकांना रोखत ताब्यात घेतले.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, नाजनीन शेख, बानूबाई शिरसाठ, सतीष रवंदळे, महेश कालरा, रिदवान अन्सारी, अलोक रघुवंशी, हर्षल पाटील आदी उपस्थित होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्ते वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात पोहचले. तेथे उपकार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले.

गेल्या अनेक दिवसांपासून फेरफार केलेले मीटर कंपनीमार्फत जमा करण्यात आले आहेत. नवे मीटर बसविण्यात आले आहेत मात्र वीज बिलांचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराकडून जास्त वीज युनिटचा वापर दाखविला जाऊन वीज बिले दुप्पट येत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. आतापर्यंत वर्षनिहाय किती मीटर फेरफार केल्याच्या कारणावरून जमा केले, मीटर बदलण्याचे किती पैसे मिळतात याची लेखी माहिती मागितली. परंतु ते लगेच उपलब्ध न केल्याने यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी शाब्दीक वाद वाढत गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. ते पोहचले त्याचवेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी उप कार्यकारी अभियंता यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.