शिंदखेडा। सध्या वीजवितरण कम्पनीचा मनमानी कारभार सुरु असून वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.वीज वितरण कंपनीला लगाम लावणे गरजेचे झाले असून मंत्रीमंडळातील विजमंत्री या कारभाराची दखल घेतील का असा प्रश्न शिंदखेडकर नागरिकांना पडला आहे.कामे तर ठेकेदार अगदीच निकृष्ट प्रकारची करीत आहे. अगदी हायपर टेन्शन लाइनचे कामेही निकृष्ट करीत असतात. अगदी किरकोळ पावसामुळेही इलेक्ट्रीक तारा कोसळतात. गाडलेले पोलही जमिनीवर कोसळतात. या प्रकारामुळे रस्त्यावरून वापरणारे अडचणीत येतात जीव धोक्यात येतो.एखाद्याचा जीवही जातो. कम्पनी नुकसान भरपाई शासन स्तरावर जरी करीत असली तरी ज्या कुटुंबावर प्रसंग येतो तो त्यालाच कळतो. म्हणून केली जाणारी कामे जबाबदारीने करणे गरजेचे आहे मात्र तसे होत नाही हे मात्र निश्चित दिसते आहे.
ग्राहकाला सेवा मिळणे गरजेचे
मीटर रिडींग करीता महिन्यातील कोणतीही एकच तारीख असावी. मीटर रिडींगप्रसंगी एखादे रिडींग काही अडचणीमुळे उपलब्ध न झाल्यास दुसर्या दिवशी रिडींग होणे गरजेचे, ग्राहक घेत असलेली जोडणी काळजीपूर्वक जोडणे गरजेचे, बिले जास्तीची असल्यास वीज ग्राहकाचे म्हणणे ऐकणे गरजेचे, वरील बाबतीत दखल घ्यावी अशी माफक मागणी नागरिकांकडून होत आहे.
मीटररिडींग न घेता वीज बिल
काही ग्राहकांना तर मीटररिडींग न घेता वीज बिल दिली जातात अशाही तक्रारी आहेत. ज्यांचा वीज वापर अतिशय कमी आहे अशा असंख्य ग्राहकांना पाच 5 हजारापेक्षाही जास्त बिल दिले जाते. नाही भरले तर त्यांच्या कोणत्याही तक्रारींची साधी दखलही घेतली जात नाही. त्यामुळे वीजग्राहक व अधिकारी यांच्यात नको तो शाब्दिक वाद विकोपाला जातो. त्यामुळे अधिकारी भादंवि 353,504,506,34, प्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात त्यामुळे नागरिक भयभीत होतात.
वायरमन पण दखल घेत नाही
शहरात काही भागात विद्युत पुरवठा खंडित होतो. तेथील कटाऊट खराब झालेले असतात तक्रार केली जाते. संबधित वायरमन पण दखल घेत नाही तासन तास विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. वीज वितरण ग्रामीण यांच्याकडे कटाऊटबाबत तपास केला असता ते म्हणतात आवश्यक असलेले लागी उपलब्ध नाही याची व्यवस्था कोण करणार याकडेही वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या शिंदखेडा शहरात मात्र वीज वितरण कम्पनीचा चांगलाच मनमानी कारभार सुरु असून सारेच त्रस्त झाले आहेत.
रिडींग एकाच तारखेला व्हावे
शहरात वीजवितरण कम्पनीद्वारे विज जोडणी केली जाते ती कामेही बेजबाबदारपणे केली जाते. तर मीटर रिडिंगचा ठेका दिला जातो. रिडींग महिन्याच्या कोणत्यातरी एकाच तारखेला होईल असे जाहीर होणे आवश्यक झाले आहे. रिडींग करण्यासाठी वेळा निश्चित होणे गरजेचे आहे. अगदी मनाला पटेल अशा वेळेत रिडिंगला येतात. त्यामुळे रिडिंगला अडचणी येतात. अगदी संध्याकाळी आल्यास ज्याच्या घराला वालकम्पाउंड असते. त्यांच्या दरवाजाला लॉक असले कि मग तर रिडींगवाल्यांची मजाच असते मग वाटेल तसे बिल देता येते हे मात्र निश्चित होत आहे.दरवाजाला लॉक असल्यास दुसर्या दिवशी येऊन रिडींग घेतले पाहिजे हे तर झालेच पाहिजे त्यामुळे एव्हरेज युनिट लाऊन बिल देणे टाळता येईल त्यासाठी वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.