वीज वाहिन्यांच्या जंजाळातून देहूरोड मुक्त होणार!

0

देहूरोड : सुमारे साठ वर्षे वीज वाहिन्यांच्या जंजाळात अडकलेले देहूरोड शहर लवकरच मोकळा श्‍वास घेणार आहे. एकात्मिक विकास योजनेच्या माध्यमातून शहरातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा भाग लवकरच भूमिगत केबलने जोडला जाणार आहे. याच योजनेतून विविध कामे हाती घेण्यात आली असून, गणेशोत्सवापूर्वीच देहूरोड बाजारपेठेतील कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. वीज जोडणी भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या निकाली निघेल, अशी माहिती महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

पाच कोटी 90 लाखांची कामे
सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराने देहूरोड परिसरातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. त्याचप्रमाणे या परिसरात विजेचा दाब कधीही वाढतो. त्यामुळे विद्युत उपकरणे जळून मोठे आर्थिक नुकसान होते. या प्रकारालादेखील नागरिक कंटाळले आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करुनही महावितरण कंपनी दखल घेत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नेमकी हीच बाब विचारात घेऊन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल तसेच मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांतून देहूरोड परिसरात महावितरण कंपनीकडून काही कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी पाच कोटी 90 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सात रोहित्रांवरील वीज जोडणी भूमिगत
भूमिगत केबल टाकण्याचे काम सध्या सुरू झाले असून, गणेशोत्सवापूर्वीच ते काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आंबेडकर हॉस्पिटल, शिवाजीनगर, मंगल कार्यालय, अबुशेठ डी. टी. सी., रेल्वे क्वॉर्टर्स् व मुख्य बाजारपेठ, गुरुद्वारा आणि शितळानगर या भागातील एकूण सात रोहित्रांवरील वीज जोडणी भूमिगत वाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे. या कामांमुळे वारंवार फ्युज जाणे, तारा तुटणे यासारख्या तक्रारी कायमस्वरुपी बंद होतील, असा दावा महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

किवळेत नवे वीज उपकेंद्र
या कामाबरोबरच किवळे येथे 22/11 केव्हीचे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 17 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या उपकेंद्रातून दोन फिडर निघणार असून जुन्या मळवली फिडरवरील किवळे, साईनगर, मामुर्डी या भागातील ग्राहकांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी सध्याचे 22 केव्हीचे 57 रोहित्र 11 केव्हीमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात कमी-अधिक दाबाने होणार्‍या वीज पुरवठ्याच्या समस्येतून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचा दावादेखील अधिकार्‍यांनी केला आहे.

अनेक कामे प्रस्तावित
महावितरण कंपनीकडून या अनुषंगाने आणखी कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये देहूरोडसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र किंवा स्विचींग सब स्टेशन हा प्रमुख भाग आहे. या उपकेंद्रासाठी के. एम. पार्कजवळ मोकळ्या जागेचा प्रस्ताव असून कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ही जागा उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विशाल खंडेलवाल यांनी दिली. या उपकेंद्रामुळे नियमित दाबाने वीज पुरवठा शक्य होणार आहे. मात्र, या उपकेंद्रासाठी निधी मंजुरीची प्रतीक्षा असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या योजनेंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालय आणि एम. बी. कॅम्प येथील महात्मा गांधी प्राथमिक शाळेसमोरील रोहित्रांची जागा बदलण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे.

शेलारवाडीतही भूमिगत वाहिन्या
शेलारवाडी येथील लघुदाब वीज वाहिन्यादेखील भूमिगत करण्यात येणार आहेत. शेलारवाडी येथे सध्या तळेगाव फिडरवरून वीज पुरवठा केला जातो. तो बदलून प्राधिकरण (निगडी) उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. एकंदरीतच ही प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यानंतर देहूरोडकरांचा विजेचा प्रश्‍न बर्‍यापैकी सुटण्यास मदत होणार आहे, यात शंकेचे कारण नाही.

विजेचे खांब हटणार
देहूरोड बाजारपेठेतील रस्ते काही वर्षांपूर्वी प्रचंड विरोध असूनही रुंद करण्यात आले आहेत. पूर्वीच्या 12/15 फुटांच्या रस्त्यांच्या जागी सध्या 22 ते 30 फुटी रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, अनेक वर्षे उलटूनही रुंदीकरणामुळे भररस्त्यात आलेले विजेचे खांब; त्यावर लोंबकळणार्‍या वीज वाहिन्या ‘जैसे-थे’ आहेत. याबाबत विचारणा केली असता, गणेशोत्सवापूर्वीच हे चित्र बदलण्याचा आपला पूर्ण प्रयत्न राहील. तशा सूचना संबंधित भूमिगत वाहिन्यांचे काम करणार्‍या ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कॅन्टोमेंन्ट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी दिली.