वरणगाव। येथील नविन प्लॉट भागातील घराहून गेलेली उच्चदाब विजवाहीनी काढण्यासाठी पालिकेचे गटनेते सुनिल काळे यानी निवेदन दिले होते. मात्र आठ दिवस उलटूनही वीज वाहिनी काढली नसल्याने या भागातील नागरीक व राजकीय पदाधिकारी यांनी विजवितरण कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी दोन दिवसात सदरचा प्रस्ताव पाठवितो असे आश्वासन अधिकार्यांनी दिल्याने नागरीकांनी काढता पाय घेतला. येथील गणपती नगर, मकरंद नगर, जगदंबा नगर, मच्छींद्र नगर, विल्हाळे रोड, साईनगर भागातील नागरीकांच्या घरावून उच्चदाब विजवाहीनी गेली होती. यामुळे या नागरीकांना वरच्या मजल्याचे काम करता येत नव्हते. तसेच पावसाळ्यात या विज वाहिनीच्या विजेचा धक्का येथील नागरीकांना जाणवत असे. यामुळे तत्कालीन पालकमंत्री संजय सावकारे यांनी विशेष निधी मंजुर करून सदरची विज वाहिनी काढण्याला मंजुरी दिली होती.
आठ दिवसात विजवाहीनी काढण्याची केली होती मागणी
यानंतर हे काम पुर्ण होवून नुतन विजवाहीनीतून उच्च दाब विज पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र विज वितरण कंपनीने जुनी विजवाहीनी काढण्याबाबत चालढकल करत असल्याने पालीकेचे गटनेते सुनिल काळे यांनी आठ दिवसाच्या आत सदरची विजवाहीनी काढण्याची मागणी केली होती अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र विज वितरणकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
यांची होती उपस्थिती
यानुसार आठ दिवसात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आज या भागातील नागरीक तसेच सुनिल काळे, उपनगराध्यक्ष शे. अखलाक शे. युसूफ, साजीद कुरेशी, हिपतेखार मिर्झा, मिलींद मेढे, हितेश चौधरी, शांताराम पाटील, कमलाकर मराठे, कैलास पाटील, प्रशांत तायडे, माऊली सोनार, संजय सोनार, सुभाष भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली दोनशे नागरीकांनी जगदंबानगर मधील उपकार्यकारी अभियंता यांच्या विजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
रहिवाशांची घातली समजूत
यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.जे. महाजन कामानिमित्त बाहेर असल्याने सहाय्यक कार्यकारी अभियंता चेतन चौधरी यांनी नागरीकांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु काम होत नाही पर्यंत जाणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी चेतन चौधरी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधुन सदरच्या कामाबाबत संपूर्ण माहिती घेत त्वरीत सदरची विजवाहिनी काढण्याच्या सुचना दिल्या तसेच त्याबाबत दोन दिवसात प्रस्ताव तयार करुन वरिष्ठ पातळीवर पाठविण्याच्या सुचना देखील दिल्या. यामुळे सदरचे नागरीकांनी काढता पाय घेतला.