वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; अपघाताची शक्यता

0

माथेरान । माथेरानमधील मुख्य पॉईंट्सकडे जाणार्‍या तसेच येथील पेमास्टर उद्यानासमोरच अनेक दिवसांपासून अतिदाबाच्या विजेच्या लाइन रस्त्यावर उघड्या अवस्थेत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांमधून सदर बाबतीत वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त होताना दिसत आहे. माथेरानमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे झाडे विजेच्या पोलवर उन्मळून पडतात. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असे याकामी मागील काळातच भूमिगत विजेच्या जोडण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्यातरी नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. परंतु, काही भागांत अतीदाबाच्या 440 केव्हीच्या विजेच्या तारा जमिनीतुन वर आलेल्या आहेत.

मागील काळातच ठरावीक ठिकाणी अशाच विजेच्या लाईनला धक्का लागुन दोन घोड्यांना आपल्या प्राणांना मुकावे लागले होते. तसेच पेमास्टर उद्यानातून नियमितपणे पर्यटक तसेच स्थानिकांची, शालेय विद्यार्थ्यांची रहदारी असते. वीज केबल जोडणीचे काम संबधीत ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. या जोडण्या जमिनीत निदान तीन फुट आत असायला हव्यात परंतु या झालेल्या कामात त्याने निष्काळजीपणा दाखवुन वरचेवर चालढकल केली आहे. याचा नाहक त्रास आणि जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता लवकरच ही कामे केली जातील असे सांगण्यात येत आहे.

आम्ही नियमितपणे या पेमास्टर उद्यानातून आमच्या घरी जात असतो. परंतु येथे विजेच्या केबल वर दिसत असल्याने रात्री अपरात्री खुपच धोकादायक बनलेले आहे. पर्यटक तसेच शालेय विद्यार्थी सुद्धा इथुनच जातात. कुठलीही जीवितहानी होण्यापूर्वी ही कामे संबधित खात्याने मार्गी लावावी.

-शैलेंद्र दळवी
स्थानिक रहिवाशी माथेरान