वीरधवल खाडेची अंतिम फेरीत धडक

0

जकार्ता-भारताच्या वीरधवल खाडेने १८ व्या आशियाई खेळांमध्ये ५० मीटर फ्री स्टाइल स्विमींगच्या पात्रता फेरीमध्ये स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत पात्रता फेरीमध्ये २२.४३ सेकंदांचा वेळ घेत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ही कामगिरी करताना त्याने स्वत:चा २२.५२ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रमाला ०.०९ सेकंदांने मागे टाकत नवीन विक्रम प्रस्थापित केला.

२००९ साली ऑगस्टमध्ये आशियाई स्वीमिंग चॅम्पिनशिप स्पर्धेत त्यांने हा राष्ट्रीय विक्रम केला होता. आज ९ वर्षांनंतर त्याने तो विक्रम मोडला.

राष्ट्रीय विक्रम मोडण्यात यशस्वी झालेला वीरधवल पात्रता फेरीमध्ये २२.४३ सेकंदांचा वेळ देऊनही तिसऱ्या स्थानी राहिला. चिनच्या हिन यू (२२.२१ सेकंद) आणि हाँगकाँगचा केथन किंग हीम (२२.३८ सेकंद) हे दोघे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिले. वीरधवलने आज पदक जिंकले तर हे त्याचे आशियाई खेळांमधील दुसरे पदक असेल. याआधी त्याने गुआंझाऊ येथे २०१० साली झालेल्या स्पर्धांमध्ये कांस्य पदक पटकावले होते.