वीरप्पनला ठार मारणारा आयपीएस अधिकारी काश्मिरमध्ये!

0

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता तिथे राज्यपाल शासन लागू झाले आहे.राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. एकीकडे राज्य अस्थिर झाले असताना, दुसरीकडे दहशतवादी कारवायांवरही सरकारचे लक्ष आहे. दहशवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. त्यासाठीच सरकारने जम्मू काश्मीरमध्ये बडे अधिकारी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्तीसगड केडरचे वरिष्ठ आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्त केले आहे. याशिवाय दुसरी महत्त्वाची नियुक्ती म्हणजे, राज्यपालांचे सल्लागार म्हणून आयपीएस विजय कुमार यांना नियुक्त करण्यात आले आहे. कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन हे नाव दक्षिणेसह संपूर्ण भारताला परिचीत आहे. चंदनासह हत्तीच्या दातांच्या तस्करी आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्त्यांमुळे वीरप्पनची दहशत होती. सरकारने त्याला पकडण्यासाठी २० कोटी रुपये खर्च केले होते.

तीन राज्यांचे पोलीस वीरप्पनच्या मागावर होते. मात्र विजयकुमार यांनी ऑपरेशन ‘कोकून’ अंतर्गत १८ ऑक्टोबर २००४ रोजी वीरप्पनचा खात्मा केला होता. त्यांनी याबाबत एक पुस्तकही लिहिले आहे. विजयकुमार १९७५ मध्ये तामिळनाडू केडरमधून आयपीएस झाल्यानंतर, त्यांनी स्पेशल सिक्युरिटी ग्रुपमध्ये सेवेला सुरुवात केली. विजयकुमार यांची स्पेशल टास्क फोर्समध्ये बदली झाल्यानंतर, त्यांच्यावर वीरप्पनला मारण्याची जबाबदारी दिली होती.