मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या दिनांक ०६ जुलै, २०१७ रोजीच्या सभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावानुसार वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशशुल्क व इतर शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे सुधारित दर १ ऑगस्ट २०१७ पासून लागू होणार आहेत.
यामध्ये १२ वर्षांवरील प्रौढ व्यक्तींकरीता दरडोई रु.५०/-, ३ ते १२ वर्षांपर्यंत मुलांकरीता रु.२५/-, १२ वर्षांवरील २ प्रौढ व्यक्ती व ३ ते १२ वर्षांपर्यंत २ मुलांकरीता रु.१००/-, खासगी शाळांतील ३ ते १२ वर्षे वयोगटातील शैक्षणिक सहलीसाठी गटाने येणाऱया शालेय विद्यार्थ्यांसाठी रु.१५, गटासोबत येणाऱया प्रौढ व्यक्तींकरीता दरडोई रु.५०/-, खासगी शाळांतील १२ वर्षांवरील वयोगटातील शैक्षणिक सहलीसाठी गटाने येणाऱया विद्यार्थ्यांकरीता दरडोई रु.२५/-, गटासोबत येणाऱया प्रौढ व्यक्तींकरीता दरडोई रु.५०/-, परदेशी अभ्यागत १२ वर्षांवरील प्रौढ व्यक्तींकरीता दरडोई रु.४००/- आणि परदेशी अभ्यागत ३ ते १२ वर्षांपर्यंत मुलांकरीता दरडोई रु.२००/- असे शुल्क आकारण्यात येणार आहे.
तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तींना विनामुल्य प्रवेश असणार आहे. दुचाकी वाहनाकरीता प्रत्येकी रु.५/-, चारचाकी वाहनाकरीता प्रत्येकी रु.२०/- आणि बससाठी प्रत्येकी रु.४०/- असा वाहनतळ शुल्क आकारण्यात येणार आहे.साध्या कॅमेऱयासाठी प्रत्येकी रु.१००/- आणि व्हिडीओ कॅमेऱयासाठी प्रत्येकी रु.३००/- शुल्क आकारण्यात येणार आहे.