पिंपरी-चिंचवड : शहराचा खूपच वेगाने विकास झाला आणि नागरीकरणही खूप मोठ्या प्रमाणात वाढले. बाहेरून येणार्या नागरिकांच्या संख्येमुळे शहराची लोकसंख्या कित्येक पटीने वाढत गेली. परंतु, या विकास आणि नागरीकरणाचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर, तो पशु-पक्ष्यांना बसला आहे. कमी झालेल्या पशुधन संख्येमुळे जिल्हा परिषदेने गेल्या वीस वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पशुवैद्यकीय दवाखाने अन्यत्र स्थलांतरित केले आहेत. काही दिवसांपूर्वीच चर्होली, चिंचवड आणि पुनावळे येथील पशुवैद्यकीय दवाखाने स्थलांतरित करण्याचे आदेश राज्य सरकारच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा नागरीकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. शहराचा ग्रामीण भाग असलेल्या रावेत, चर्होली, मोशी, चिखली या भागात अनेक गृहप्रकल्प तयार झाले असून, पारंपरिक शेती कमी झाल्याने पशुधनाची संख्यादेखील झपाट्याने कमी होत आहे. सध्या शहरात 12 हजार पशुधन शिल्लक असल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे आहे.
असे झाले स्थलांतर
1997 साली राज्य सरकारने 14 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्यास मान्यता दिली. यामध्ये तळवडे, चर्होली, मोशी, चिखली, रावेत, डुडुळगाव, चोवीसावाडी, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, पुनावळे व ताथवडे या गावांचा समावेश आहे. या गावांच्या समावेशानंतर राज्य सरकारच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने श्रेणी दोनचे वाकड, रावेत आणि मोशी या तीन ठिकाणचे पशुवैद्यकीय दवाखाने अन्यत्र स्थलांतरित केले. त्यानंतर 2 जुलै 2017 ला पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडलेल्या बैठकीत चिंचवड, चर्होली व पुनवाळे येथील तीन पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या अन्यत्र ठिकाणच्या स्थलांतराला मान्यता देण्यात आली. यापैकी चिंचवड येथील दवाखाना हवेली तालुक्यातील अष्टापूर, चर्होली व पुनावळे येथील दवाखाने शिरूर तालुक्यातील अनुक्रमे रांजणगाव सांडस व निमगांव म्हाळुंगी येथे स्थलांतरित केले आहेत.
पालिकेच्या दवाखान्यांवर अतिरिक्त ताण
सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पिंपरी व निगडी-प्राधिकरण अशा दोन ठिकाणी पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी दोन पशुवैद्यकीय दवाखाने सुरू आहेत. तर जिल्हा परिषदेचे थेरगाव डांगे चौकात कृत्रिम रेतन बीज केंद्र आहे. शहरातील सहा पशुवैद्यकीय दवाखाने स्थलांतरित झाले असल्याने त्याचा अतिरिक्त ताण महापालिकेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, तरीदेखील अलीकडच्या काळात महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात काही मोजकेच पशू उपचारासाठी दाखल झाले होते. यामध्ये कुत्र्याने चावा घेतलेले वासरू, जखमी झालेला उंट व घोडे अशा प्राण्यांचा समावेश आहे.
दोनपेक्षा अधिक दवाखाने हवेत
सद्यस्थितीत शहरातील पशुधनाची संख्या 12 हजार एवढी आहे. शासकीय निकषानुसार पाच हजार पशुधनासाठी एक दवाखाना आवश्यक आहे. शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या स्थलांतरानंतर पाळीव प्राण्यांशिवाय खास पशुधनासाठी दवाखाना सुरू करायचा झाल्यास, अशा दोन पशुवैद्यकीय दवाखान्यांची आवश्यकता भासणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीन तसेच माण, सूस आणि धायरी हे तीन असे एकूण सहा ठिकाणचे पशुवैद्यकीय दवाखाने स्थलांतरित केले आहेत. यापैकी शिरुर तालुक्यात सर्वाधिक पाच दवाखान्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुणे शहराजवळच्या वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या कक्षा रुंदावल्यानेच, हे दवाखाने अन्यत्र स्थलांतरित करण्याचे कारण नमूद केले आहे.