पर्यावरण संवर्धन समितीची महापालिकेकडे मागणी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील वृक्षगणनेच्या रेंगाळलेल्या निर्णयाला कार्यक्षम बनवत वृक्षगणना आधुनिक पद्धतीनेच व्हायला हवी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केली आहे. याबाबत पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रत्येक पाच वर्षांनी वृक्षगणना करून त्या बाबतची सर्व माहिती शासनाच्या वन विभागास देणे बंधनकारक आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2007 पासून आजपर्यंत वृक्षगणनेसाठी सुस्त धोरण अवलंबिले आहे. पर्यावरण संस्था व नागरिकांकडून याबाबत विचारणा केली असता वेळ मारून नेण्याचा प्रकार नागरिकांना पाहायला मिळाला, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
अधिकार्यांची नकारात्मक मानसिकता
मधल्या काळात पर्यावरण संवर्धन समिती, इंद्रायणी बचाव कृती समिती, पवना सुधार मंच, सामाजिक हित संवर्धन समिती, मुळा संवर्धन समिती यासारख्या संस्थांनी न्यायालयात जाऊन या बाबत दाद मागण्याची भूमिका घेतली. पण हाती काहीच आले नाही. आयआयटी पवई येथील तज्ज्ञांनी महापालिकेला प्रात्यक्षिकातून आधुनिक पद्धतीने वृक्षगणना करण्याची पद्धत सांगितली. त्यासाठी खर्चही अल्प येणार आहे. परंतु, ही बाबही महापालिका अधिकार्यांनी बासनात गुंडाळून ठेवली. यावरून अधिकार्यांची नकारात्मक मानसिकता लक्षात येते.
शंका आम्ही दूर करू
पर्यावरण संवर्धन समितीने महापालिका प्रशासनाला आधुनिक पद्धतीने वृक्षगणना करण्यासाठी काही उपाय सुचविले. त्यानुसार कमीत कमी खर्चात पण आधुनिक तंत्रज्ञान वापरून वृक्षगणना व्हावी, यासाठी समिती आग्रही आहे, अशी माहिती विकास पाटील यांनी दिली. वृक्षगणनेसाठी पुणे महापालिकेत जो गोंधळ झाला; तसाच गोंधळ आणि संभ्रम पिंपरी महापालिकेत होऊ नये, यासाठी महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्याकडे काही शंका असतील तर त्यांचे निरसनदेखील आपण करू शकतो, असे पाटील म्हणाले.