वृक्षतोडप्रकरणी उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे यांना नोटीस

0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी महापालिकेचे ठेकेदार व इतरांकडून विनापरवाना वृक्षतोड होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. ही बाब वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सोमवारी नगरसेवकांनी उपस्थित केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांना आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. तर, नगरसेवकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

इंद्रायणीनगरात अवैध वृक्षतोड…

इंद्रायणीनगरमधील संजीवनी कॉलनी येथे रविवारी अवैध वृक्षतोड झाली. लाकडे वाहून नेणारी गाडी पर्यावरणप्रेमींनी पकडल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा छाटणीची परवानगी नसल्याचे समोर आले. या वाहनाची तक्रार पोलीस कंट्रोल रुमला करण्यात आली. त्यामुळे वाहनचालक टेम्पो सोडून पसार झाला. दरम्यान, उद्यान विभागाच्या कर्मचार्‍यांनी पाहणी केल्यानंतर ठेकेदाराला परवानगी फांद्या छाटण्यासाठी असताना त्याने झाडे तोडल्याचे निदर्शनास आले.

पर्यावरण प्रेमींची महापालिका आयुक्तांकडे तक्रार…

या सगळ्याबाबत पर्यावरण प्रेमींकडून पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली. ही बाब सोमवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत नगरसेवक तुषार कामठे, विलास मडिगेरी यांनी प्राधिकरणाचे अध्यक्षा तथा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना ऩिदर्शनास आणून दिली. तसेच, मडिगेरी यांनी मुख्य उद्यान अधिक्षक साळुंखे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्याला कामठे यांनी अनुमोदन दिले.

खाळुंखेंनी घातला वाद…

दरम्यान, बैठकीत साळुंखे यांनी या प्रकरणावरून वाद घातला. या प्रकरणी आयुक्त हर्डीकर यांनी साळुंखे यांना नोटीस बजावत असल्याचे सांगितले. त्यांचा खुलासा आल्यानंतर कारवाईचे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य तुषार कामठे यांनी सांगितले.