होळनांथे (योगेश पाटील)। शिरपूर तालुक्यातील अनेरडॅम अभयारण्याची अवस्था दयनीय झाली असून अभयारण्य क्षेत्रात प्रचंड वृक्षतोड व उभ्या असलेल्या वृक्षांना जाळून देणे यासारख्या प्रकाराने अभयारण्यात वृक्ष सुरक्षीत राहिले नसून वन्यजीवाचे दर्शन कालबाह्य होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर तालुक्याला हरित समृद्धी प्राप्त करून देण्यात अनेरडॅम प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. हिसाळे गावा शिवारात असलेल्या अनेरडॅम प्रकल्प हा सातपुड्याच्या डोंगरटेकड्यातून नैसर्गिक स्वरूपात निर्माण झाला असून येथे मोठ्या प्रमाणात विविध जातीचे वृक्ष होत. परिणाम वन्यजीव विविध प्राणी-पक्षांचे थवे येथे पहावयास मिळत होते. परंतु प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्याने व उभ्या वृक्षांनाच जाळण्याचा प्रकाराने विविध जातीच्या झाडा-झुडपांचे, प्राणी-पक्षांचे वास्तव्यही कालबाह्य होत आहे.
संरक्षण कुटीलाच संरक्षणाची गरज
अनेरडॅम अभयारण्यात वन्यजीव विभाग नासिक अंतर्गत सन 2015 ते 2016 मध्ये संरक्षण कुटीचे काम करण्यात आले. 2016 च्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण झालेल्या संरक्षण कुटीचे दरवाजा व खिडक्या ह्या 2017 च्या पहिल्याच महिन्यात गायब झाल्या असून नुसताच सदर कुटीला प्लॉयवूडचा दरवाजा बसविण्यात आला आहे. सदर कुटीचा आश्रय घेऊन वन अधिकारी व कर्मचारी हे वन्यजीव प्राण्यांचे रक्षण करीत असतात परंतु संरक्षण कुटीलाच संरक्षणाची गरज निर्माण झाली असल्याने येथील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
लाखोंच्या योजना धुळखात
अनेरडॅम अभयारण्य क्षेत्रात येत असलेल्या परिसरात संरक्षण कुटी, संरक्षण चौकी, पॅगोडा तसेच पर्यटर विकास योजने अंतर्गत विविध कामे झालेली दिसून येत असली तरी सदर कामाची अवस्था वर्षभराच्या आतच दयनीय झाली आहे. अनेरडॅम परिसरात मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, शासकीय योजनांच्या माध्यमातून झालेल्या बांधकामाची दुर्दशा तसेच उभ्या वृक्षांनाच जाळून देण्याचा खेदजनक प्रकार होत असतांना अधिकार्यांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
प्रचंड प्रमाणात वृक्षतोड
अनेरडॅम अभयारण्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली असून एकेकाळी विवधि जातीच्या वृक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेरडॅम परिसरात तिवस जातीचे झाड सोडून इतर झाडे नामशेष (नष्ट) होण्याच्या मार्गावर आहेत. येथे सर्रासपणे झाडांची कत्तल होत असून तिवस जातीचे झाड व लाकुड तोडण्यास कडक असल्याने सदर झाड उभे असतांनाच जाळण्याचे प्रकार येथे होत असतात.