जैताणे । साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे येथील ‘वृक्षसंवर्धन ग्रुप’ निसर्गाच्या सेवेत आहेत. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे. त्याचप्रमाणे निसर्गसेवा देखील ईश्वरसमानच आहे. यादृष्टीने निजामपूर जैताणे येथील आठ जणांचा समूह फक्त वृक्षारोपण नव्हे तर त्या वृक्षाचे संगोपनदेखील करत आहेत. निजामपूर अक्षरधाम येथे खारट माती असून झाडे जगत नव्हते अशा ठिकाणी या समूहातर्फे वृक्ष लावण्यात आली तसेच त्यांची देखभाल देखील करण्यात येत आहे. या जागेवर 30 ते 35 झाडे त्यांनी जगविली आहेत. एवढेच नव्हे तर रिप्लांट पद्धतीने देखील त्यांनी त्या जागेवर झाड जगविले आहे.
कार्याचा गौरव
निजामपूर जैताणे येथील रुग्णसेवेत सक्रिय असणारे दिनेश मालपुरे, चंद्रकांत पवार, उदयकुमार जयस्वाल, डॉ.सुनिल जाधव, डॉ.कमलेश पाटील, जितेंद्र येवले, योगेश सोनवणे व राहुल नावरकर हे सर्व जण वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धनाचे कार्य करत आहेत. रोज मिळेल त्या वेळेत झाडांना पाणी, खत, ढाटणी हे काम सातत्याने करत असतात. वृक्षसंवर्धन ग्रुपच्या या कार्याची दखल घेत निजामपूर येथील गोकुळदास आमीचंददास गुजराथी पतसंस्थेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. निसर्ग आपल्या सेवेत आहे आणि आपण देखील त्याचे देणे लागतो म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल या पद्धतीने कार्य केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. गुजराथी पतसंस्थेतर्फे त्यांना जाळी भेट देण्यात आली.