वृक्षसंवर्धन समितीला मुहूर्त मिळेना

0

पुणे । शहरातील वृक्षसंपदेच्या निगराणीसाठी तसेच त्यात वाढ व्हावी, यासाठी स्थापन झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीचे कामकाज काही सुरू व्हायलाच तयार नाही. उद्यान विभाग व ही समिती यांच्यात वर्चस्वावरून शीतयुद्ध सुरू आहे. त्यातच आता 25च्या आतील संख्येने वृक्षतोडीसंबधीचे सर्व निर्णय आयुक्त स्तरावर घेण्यात येणार असल्याने समितीचे स्थानही दुय्यम होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संरक्षण अधिनियम 1975 या अन्वये राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक पंचवार्षिकमध्ये अशी समिती स्थापन केली जाते. मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेत स्थापन झालेली समिती स्वयंसेवी संस्था, संघटनांमुळे कायद्याच्या फेजयात अडकली व 5 वर्षे त्यांना काम करणेच शक्य झाले नाही.यावेळच्या पंचवार्षिकमध्ये स्थापन झालेल्या समितीसमोरही आता नव्याने अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे स्थापना होऊन 4 महिने होत आले तरीही त्यांना काही काम करता येणे शक्य झालेले दिसत नाही.समितीच्या सदस्य सचिव या पदावरून वाद सुरू झाला आहे. अन्य महापालिकांमध्ये या पदाचे कामकाज उद्यान अधीक्षकांकडूनच पाहण्यात येते. समितीच्या बैठका बोलावण्याचे मुख्य काम असते.