कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरात रस्त्याच्या दुतर्फी झाडांना मिलिबग या घटक रोगाने ग्रासले आहे. शहराच्या विविध ठिकाणच्या 100 हून अधिक झाडांना या रोगाने ग्रासले असून झपाट्याने फैलाव झालेल्या रोगामुळे हिरव्यागार पानांनी बहरलेले वृक्ष काही दिवसातच सुकून जात आहेत. या माहितीला उद्यान विभागानेही दुजोरा दिला आहे. या रोगापासून वृक्षाची राखण करायची कशी याचे उत्तरच त्यांच्याकडे नाही. डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर महाविद्यालयासमोरील 10 ते 12 सुंदर डेरेदार वृक्ष अचानक सुकून गेली आहेत. याबाबत शहनिशा करताना शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठमोठ्या वृक्षावर विशेषत: रेन ट्री अशा प्रकारे अचानक सुकत असल्याचे निदर्शनास आले. या वृक्षाची नीट पाहणी केल्यावर कापसासारखा पांढरा बुरशीजन्य मिलीबग नावाच्या आजाराची या वृक्षांना लागण होत असून या रोगाचे विषाणू या झाडातील सर्व रस शोषून घेत असल्यामुळे झाडे सुकून जात आहेत.
नव्याने होणार वृक्षारोपण
डोंबिवलीतीलच नव्हे तर आग्रा रोड, बिर्ला कॉलेज समोर, अग्निशमन कार्यालय समोरील रस्त्यावर, आधारवाडी जेलनजीक तसेच मुरबाड डायव्हर्शन रोड लगत असलेली सुमारे 100 पेक्षा अधिक झाडे मागील 2 वर्षात सुकली आहे. सुकलेल्या झाडाच्या फांद्या पादचार्यांच्या अंगावर कोसळून नुकसान होऊ नये यासाठी ही झाडे तोडावी लागत आहेत. या झाडाच्या जागी नव्याने वृक्षारोपण केले जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातही मोठमोठ्या वृक्षांना मिलीबग या घातक रोगाची लागण झाली आहे. या रोगापासून झाडाचा बचाव करायचा तरी कसा? याचे उत्तर सापडलेले नाही. एका विशिष्ट रोगाची लागण असून हे वृक्ष कोणत्याही विषबाधेने बाधित झालेले नाही. मोठ्या वृक्षावर फवारणी करणे शक्य नाही. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी 100 पेक्षा अधिक वृक्ष मृतावस्थेत पोहचले आहेत. मात्र उद्यान विभागाकडून या जागेवर नव्याने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
संजय जाधव, उद्यान निरीक्षक