वृक्ष दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा भुसावळात जागर

0

नगरापालिकेचा उपक्रम : उद्दिष्टांपेक्षा अधिक झाडांची होणार लागवड -नगराध्यक्ष रमण भोळे

भुसावळ- पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे असलेले महत्व पटवून देण्यासाठी भुसावळ नगरपालिकेतर्फे शनिवारी सकाळी वृक्षदिंडी काढण्यात आली. लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती केली. जामनेर रोडवरील म्युन्सीपल हायस्कूलपासून वृक्ष दिंडीला सुरुवात झाली. आमदार संजय सावकारे यांनी दिंडीला हिरवी झेंडी दाखवली. बाजारपेठ पोलीस ठाणे, यावल रोडवरून ही दिंडी तापी नगरातील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले. पदाधिकार्‍यांच्या हस्ते प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.

यांचा सहभाग
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक किरण कोलते, प्रा.दिनेश राठी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, रमेश नागराणी, पुरूषोत्तम नारखेडे, परीक्षीत बर्‍हाटे, उपमुख्याधिकारी देशपांडे यांच्यासह पालिका कर्मचारी तसेच म्युन्सीपल व डी.एस.हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले.

उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची होणार लागवड
‘एकच लक्ष 13 कोटी वृक्ष’ या धोरणानुसार पालिकेला सुमारे दोन 300 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापेक्षाही अधिक प्रमाणात पालिका वृक्षांची लागवड करणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले. वृक्षारोपण सप्ताहाला सुरुवात झाली असून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घोषवाक्यांनी वेधले लक्ष
वृक्षदिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी’, ‘एक घर एक पेड, संतुलन का यही है खेल’ यासह विविध बोधपर फलकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले.